विरोधकांकडून भुयारी गटार योजनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; कामही पूर्ण करण्याचा दिला विश्वास

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरीच्या भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव आम्ही दाखल केला. मंजुरीच्या टप्प्यात असताना सरकार बदलले. आमच्याच प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली. सरकार बदलल्याने, त्याची माहिती पालिकेतील विरोधकांना अगोदर समजली. आता, आमच्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. परंतु, योजना आम्हीच राबविणार आहोत, असे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी पालिकेतील विरोधक रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी राहुरीच्या भुयारी गटार योजनेच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळाल्याची माहिती दिली. त्यावर आमदार तनपुरे बोलत होते. आमदार तनपुरे म्हणाले, नगरविकास राज्यमंत्रीपदी काम करताना राज्यातील अनेक नगरपरिषदांच्या भुयारी गटार योजनांची कामे दहा वर्षांपासून रखडल्याचे निदर्शनास आले. त्यांची कामे रखडण्याची कारणे तपासली. तसे राहुरीत घडू नये. यासाठी कन्सल्टंट बरोबर तीन-चार वेळा बैठका घेतल्या. योजनेच्या मुख्य मलशुद्धीकरण केंद्राची पूर्वीच्या जागेत वाद होण्याची शक्यता होती. त्यामुळे, ज्ञानेश्वर उद्यान जागा निश्चित करून प्रस्तावात बदल सूचविले.

योजनेचा अचूक प्रस्ताव मंजुरीसाठी सहा महिन्यांपूर्वी दाखल केला. तांत्रिक मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असताना सरकार बदलले. मंजुरी प्रक्रिया रखडली. आता, त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली. अवघ्या तीन महिन्यांत प्रस्ताव तयार करून त्याला तांत्रिक मान्यता मिळाली, असा दावा हास्यास्पद आहे. केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न आहे. केंद्र व राज्याची अमृत-2 योजना एक लाख लोकसंख्येच्या मोठ्या नगरपरिषदांसाठी आहे. याची विरोधकांना माहिती नाही. त्यामुळे, सहा महिन्यांपूर्वी मी प्रयत्न केले असते. तर अमृत-2 योजनेत समावेश झाला असता, असा विरोधकांचा दावाही चुकीचा आहे, असेही तनपुरे यांनी सांगितले.
