संगमनेर तालुक्याने ओलांडले कोविड बाधितांचे अठ्ठावन्नावे शतक! गेल्या दोन दिवसांत तालुक्यातून समोर आले पंचेचाळीस जणांचे संक्रमित अहवाल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात सुरु असलेले कोविडचे संक्रमण आजही अव्याहत आहे. अर्थात चालू महिन्यात आत्तापर्यंतच्या 20 दिवसांत कोविडने मृत्यू झाल्याचे एकही शासकीय वृत्त नाही. त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव कायम असला तरीही त्याची जीवघेणी दाहकता मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी रॅपिड अँटीजेनसह शासकीय व काही खासगी प्रयोगशाळांना सुट्टी असल्याने रुग्णसंख्या रोडावली होती. त्यामुळे रविवारी तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत अवघ्या सात जणांची भर पडली, विशेष म्हणजे त्यात शहरातील केवळ एका रुग्णाचा समावेश होता. तर आज एकूण अडतीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याने बाधितांचे अठ्ठावन्नावे शतक ओलांडीत 5 हजार 815 रुग्णसंख्या गाठली आहे.
जगभरात दहशत निर्माण करणार्या कोविडची संभाव्य दुसरी लाट पहिल्यापेक्षाही अधिक प्रलयंकारी असेल असे अंदाज विविध माध्यमांद्वारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविले होते. त्यातच नोव्हेंबरमध्ये भारतीय परंपरेतील दिवाळीचा सर्वात मोठा सण आणि त्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेले भारतीय नागरिक हे दृष्य तज्ज्ञांच्या दाव्यांना एकप्रकारे पाठबळच देतात की अशी स्थिती होती. दिवाळीनंतर लागलीच दुसर्या दिवशी बाधितांच्या संख्येत चढत्याक्रमाने वाढही होत गेली, ती 9 डिसेंबरपर्यंत कायम होती. मात्र त्यानंतर दररोजच्या रुग्णवाढीच्या सरासरीत सातत्याने घट होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. मात्र कोविडचा धोका आजही कायम असल्याने नियमांचे पालन हाच एकमेव उपाय आहे याचे प्रत्येकाने स्मरण ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यातच आता कोविडची नवी आवृत्ती समोर आल्याने जगातील काही देशांमध्ये काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्याकडेही सरकारे काहीशी कठोर झाली आहेत. खासकरुन परदेशात कोविडच्या नव्या विषाणूंचे संक्रमित आढळल्यानंतर भारत सरकारनेही ब्रिटनमधून येणारी विमान वाहतूक बंद केली आहे, तर राज्य सरकारने महापालिकांच्या क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. युरोपीय देशातून येणाऱ्या प्रवाशांनाही 14 दिवस विलगीकरणात ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव कमी होत आहे असे वाटत असताना या नव्या विषाणूंंनी पुन्हा एकदा जगाचा थरकाप उडविला आहे.
दररोज सापडणाऱ्या सरासरी रुग्णसंख्ये पेक्षा आज समोर आलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. मात्र रविवारी शासकीय प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचण्या करणारे कर्मचारी व काही खासगी प्रयोगशाळांंनाही साप्ताहिक सुट्टी असल्याने रविवारी येणाऱ्या अहवालांची संख्या कमी असते. कालही खासगी प्रयोगशाळेकडून अवघे सात अहवाल प्राप्त झाले होते. त्यात शहरातील एकासह ग्रामीण भागातील सहा जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले होते. काल राहिलेले व आजच्या चाचण्यांंचे असे एकत्र मिळून आज एकूण 38 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात शहरातील नऊ जणांचा समावेश आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालातील सात खासगी तर अवघा एक अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. उर्वरित सर्व निष्कर्ष रॅपिड अँटीजेन चाचणी द्वारा समोर आले आहेत.
आज पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये शहरातील पद्मनगर परिसरातील 37 वर्षीय महिला, अकोले नाका परिसरातील 56 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय मुलगा, चैतन्य नगर मधील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मिसाल हाऊस येथील 53 वर्षीय महिला, तसेच केवळ संगमनेर असा नामोल्लेख केलेल्या 45, 44 व 33 वर्षीय तरुण तरुण आणि 70 वर्षीय महिला संक्रमित झाले आहेत. तर ग्रामीण भागातील शेडगाव येथील 32 वर्षीय तरुण, शिबलापुर येथील 40 वर्षीय महिला, अकलापुर येथील 26 वर्षीय तरुण, भोजदरी येथील 17 वर्षीय तरुणी, केलेवाडी येथील 23 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 49 वर्षीय इसम, संगमनेर खुर्द मधील 42 वर्षीय महिला, धांदरफळ येथील 62 वर्षीय जेष्ठ नागरिक, निमज येथील 40 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 21 वर्षीय तरुण.
कर्जुले पठार येथील 53 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 47 वर्षीय इसमासह 22 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 50 व 45 वर्षीय इसमासह 29 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 55 वर्षीय इसम व 35 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 8 व 4 वर्षीय बालके, कर्हे येथील 52 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुणी, पिंपळगाव देपा येथील 60 व 53 वर्षीय इसम, राजापूर येथील 53 वर्षीय इसमासह 34 वर्षीय महिला व मालदाड येथील 70 वर्षीय महिला कोविड बाधित झाल्याचे समोर आले आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत 38 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने कोविड बाधितांचे अठ्ठावन्नावे शतक पार करुन 5 हजार 815 रुग्णसंख्या गाठली आहे.
रविवारी (ता.20) केवळ खासगी प्रयोगशाळेकडून सात जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात शहरातील मालदाड रोडवरील 55 वर्षीय इसमाचा एकमेव समावेश होता. त्याशिवाय निमजमधील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, देवगावमधील 34 वर्षीय तरुण, नान्नज दुमाला येथील 43 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 36 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील 36 वर्षीय तरुण व कोल्हेवाडी येथील 23 वर्षीय तरुण अशा एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते.