कोपरगाव शहरात अवैध पाणी फिल्टर प्लांट ‘सील’! पालिकेच्या कारवाईनंतर अवैध प्लांटचालकांचे धाबे दणाणले

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
केंद्रीय भूजल प्राधिकरण, हरित लवाद व अन्न व औषधी प्रशासनाने आदेश जारी केल्यानंतर कोपरगाव नगरपालिकेने शहरात अवैध पाणी फिल्टर प्लांट सील करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील एका अवैध पाणी फिल्टर प्लांट सुरू करुन कारवाईचा श्रीगणेशा केला असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांत सर्वत्र विना परवाना हजारोंच्या संख्येत पाणी फिल्टर प्लांट सुरू करण्यात आले असून या प्लांटमध्ये नागरिकांना जार आणि बाटलीमधून थंड पाण्याचा पुरवठा केला जात आहे. कोपरगाव शहरात व तालुक्यात देखील असे प्लांट सुरू झाले आहेत. प्लांट सुरू करण्यासाठी केंद्रीय भूजल प्राधिकरण, अन्न व औषधी प्रशासन आणि हरित लवाद यांचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. मात्र अनेक प्लांटधारकांनी कोणतीही परवानगी अथवा ना हरकत दाखला न घेता प्लांट सुरू केल्याचे एका पाहणीत समोर आल्याने या बेकायदेशीर प्लांटविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणारे पाणी फिल्टर प्लांट वादग्रस्त ठरले आहेत. न्यायालय आणि हरित लवादाने ज्यांच्याकडे शासनाची रीतसर परवानगी नाही असे सर्व प्लांट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरात 35 पाणी फिल्टर प्लांट हे अनधिकृत व बेकायदेशीर आढळून आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने श्वेता शिंदे, ऋतुजा पाटील, भाऊ वाईखिंडे, योगेश खैरे, रोहित सोनावणे, सुनील आरणे, राजेश गाडे, मार्गदर्शक उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्या पथकाची नेमणूक केली आहे.

कोपरगाव शहरात एकूण 170च्या आसपास पाणी फिल्टर प्लांट असून, त्यात फक्त 35 प्लांट हे अवैध असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बाकीच्या प्लांटधारकांची चौकशी करून पुढील काळात नगरपालिका त्यांच्यावर कारवाई करेल कि नाही, का फक्त कागदोपत्रीच सील करण्यात येईल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Visits: 104 Today: 1 Total: 1106537

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *