आमदारांच्या आश्वासनानंतरही रस्त्यांचे भाग्य उजळेना! पळसुंदे, सातेवाडी, खेतेवाडीतील नागरिक समस्यांनी त्रस्त


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील पळसुंदे, सातेवाडी, खेतेवाडी या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून या भागातील रस्त्यांचे तीनतेरा वाजलेले आहेत, एक वर्षापूर्वी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी रस्ते करण्याचे आश्वासन देऊनही या रस्त्यांचे भाग्य उजळले नाही, अशी खंत या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याने कोणतेही वाहन चालविणे अवघड झालेले आहे. यामुळे या भागातील नागरिकांना मानदुखी, पाठदुखीचे आजार वाढले असून अनेकवेळा अपघातांना सामोरे जावे लागत आहे. तसेच या भागात बीएसएनएलचे सात आठ महिन्यांपासून टॉवर असूनही त्याला रेंज मिळत नाही, त्यामुळे हे टॉवर लवकरात लवकर चालू करावे, अशी मागणी हे नागरिक करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या टॉवरला लागणारा विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनीकडून होत नाही, असे समजते. मोबाइलला रेंज कधीकधी दोन तीन तास मिळते तर कधीकधी मोबाइलला रेंज मिळत नाही.

त्यामुळे अचानक काही परिस्थिती उद्भवली तर संपर्क होण्यास अडचण निर्माण होते. तसेच स्वस्त धान्य वितरणाचा मोठा प्रश्न तयार होत आहे. या परिसरात 7 ते 8 हजार बीएसएनएलचे ग्राहक असूनही प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असून अक्षरशः चुना लावत आहेत. करोना काळापासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून आबिटखिंड ते आश्रमशाळापर्यंत या रस्त्याला एक ते दोन फुटाचे खड्डे पडले असून वाहन चालविताना अक्षरशः नागरिकांच्या अंगावर काटे येतात. घरकुलांचे सर्व्हे झालेले आहेत. मात्र या यादीतून अनेकांची नावे वगळण्यात आली आहे. जी घरकुलांची कामे झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. अशी तक्रार येथील नागरिक करीत आहेत. यावर्षी होणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व समस्या माहीत असलेला उच्चशिक्षित उमेदवार आम्हांस मिळाला पाहिजे, अशी मागणी युवक करीत आहेत.

Visits: 2 Today: 1 Total: 23173

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *