सलून व्यावसायिक हल्ला प्रकरणी राहाता पोलिसांना निवेदन
सलून व्यावसायिक हल्ला प्रकरणी राहाता पोलिसांना निवेदन
नायक वृत्तसेवा, राहाता
येथील सलून व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मखाना यांच्यावर बुधवारी अज्ञात व्यक्तींनी पायावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याच्या घटनेचा राहाता शहर नाभिक संघटनेने निषेध व्यक्त करीत फरार आरोपींना त्वरीत अटक न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सलून दुकान बंद करून रवींद्र मखाना घरी जात असताना अज्ञात दोन जणांनी मखाना यांच्या पायावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले होते. शहरातील घोलप मंगल कार्यालय जवळ ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली होती. घटनेनंतर मखाना यांना त्वरीत शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येे प्रथम उपचारांसाठी व नंतर नाशिक येथे हलविण्यात आले होते. या घटनेनंतर शहरातील नाभिक समाजाने शुक्रवारी (ता.20) काळ्या फिती लावून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्यावतीने ठाणे अंमलदार यांना निवेदन दिले. या निवेदनातून आरोपींना आठ दिवसांच्या आत अटक करावी, अन्यथा गाव बंद करुन तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडू असा इशारा नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष मनोज वाघ, तालुकाध्यक्ष अशोक कोरडे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, पांडुरंग तुपे, विशाल मखाना, संतोष मखाना, माधव बिडवे, बंटी तुपे, प्रवीण तुपे, पत्रकार विलास तुपे, बंटी तुपे, संजय जाईबहार, किरण तुपे, किशन बिडवे, कार्तिक वाघ, संदीप तुपे, रवी बोर्डे, हर्षल ठाकरे, दिगंबर तुपे, देविदास तुपे, सौरभ नागभाती, सचिन जाधव, ऋषी तुपे आदी नाभिक समाज बांधवांनी दिला आहे.