संगमनेरकरांना सहा दिवस मिळणार मनोरंजनाची मेजवाणी! संगमनेर फेस्टिव्हल; विनोदाचा बादशाह सारंग साठ्ये करणार गुरुवारी शुभारंभ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 14 वर्षांपासून संगमनेरकर कलारसिकांच्या मनोरंजनाचा केंद्र ठरलेल्या संगमनेर फेस्टिव्हलला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. गणेशोत्सवातील सहा दिवस चालणार्या या लोकोत्सवात यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध विनोदी कलाकार सारंग साठ्ये यांच्या कार्यक्रमाने फेस्टिव्हलचा शुभारंभ होणार आहे. याशिवाय यावर्षी मोरुची मावशी आणि संज्या छाया या दोन धमाल नाटकांचीही मेजवाणी रसिकांना मिळणार आहे. तर, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणार्या डान्सिंग सुपरस्टार या स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आल्याची माहिती संगमनेर फेस्टिव्हलचे जनक मनीष मालपाणी यांनी दिली.
कोविड संक्रमणाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा मोठ्या जल्लोशात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेल्या संगमनेर फेस्टिव्हलमध्येही दिमाखदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश स्थापनेच्या दुसर्या दिवसापासून सुरु होणार्या या लोकोत्सवाचा शुभारंभ मराठी रंगमंचावर धमाल उडविणार्या सारंग साठ्ये या विनोदविराच्या कार्यक्रमाने होणार आहे. शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण इतिहासाचा मागोवा घेणारी ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ ही सुरेल गीतांची मैफील आयोजित करण्यात आली आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या निवेदनातून सादर होणार्या या अनोख्या कार्यक्रमातून गायनासोबतच नृत्य व चित्रफितीतून मराठी चित्रपटसृष्टीचा प्रवास उलगडणार आहे.
शनिवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनाचा वेध घेणारा एकपात्री कलाविष्कार सादर होणार असून प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण ‘आनंदडोह’ या कार्यक्रमातून तुकाराम महाराजांची जीवनगाथा उलगडणार आहेत. रविवार 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटात होणार्या या स्पर्धेसाठी एकूण 68 हजारांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. डान्स इंडिया डान्स या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलाकार ठरलेले दीपक हुलसुरे या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.
सोमवार 5 व मंगळवार 6 सप्टेंबर रोजी संगमनेरकर नाट्य रसिकांसाठी दोन धमाल विनोदी नाटकांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध मराठी अभिनेता भरत जाधव याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मोरुची मावशी’ या धमाल नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी हसत-खेळत डोळ्यात अंजन घालणार्या, पंडित दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित झालेल्या आणि विनोदी अभिनेते वैभव मांगले व निर्मिती सावंत यांच्या बहारदार अभिनयाने तुफान गाजलेल्या ‘संज्या छाया’ या धमाल नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या दुसर्या दिवसापासून मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड येथे सहा दिवस चालणार्या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये सर्वांसाठी प्रवेश खुला आहे. संगमनेरकरांनी या सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी, कोषाध्यक्ष उमेश कासट यांच्यासह राजस्थान युवक मंडळाच्या सदस्यांकडून करण्यात आले आहे.