शनि मंदिरात शनि यंत्रालाच बंदी! देवस्थानचा निर्णय; भाविकांची लूट थांबणार

नायक वृत्तसेवा, नेवासा
शनिशिंगणापूरात भाविकांची होणारी फसवणूक व वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन, देवस्थानाने पूजा साहित्याच्या ताटातील सर्व यंत्रे मंदिरात नेण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे भाविकांची लूट थांबणार असल्याने त्याचे स्वागत होत आहे.

चार दिवसांपूर्वी शनिवारी (ता. 30) अमावस्या यात्रेत मंदिर परिसरात यंत्राचा सडा पडला होता. ती पायदळी तुडविली जात असल्याने त्यांचे पावित्र्य नष्ट होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यानंतर विश्वस्त मंडळाने बैठक घेऊन पूजेच्या ताटातील नवग्रह, शनियंत्र, शिक्का व कलशयंत्र मंदिरात नेण्यास बंदी घातली आहे. देवस्थानच्या या धाडसी निर्णयानंतर पूजाविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. बंदी घातलेल्या वस्तूंसह पूजेचे ताट पाचशे ते दोन हजार रुपयांना विकले जात होते. देवस्थानच्या या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.

पूजा साहित्याचे पावित्र्य लक्षात घेऊन काही वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. या वस्तू मंदिरात जाणार नाहीत. याकरिता सुरक्षा विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.
– भागवत बानकर (अध्यक्ष, शनैश्वर देवस्थान)


यंत्रांवर बंदी आणली असली, तरी नालविक्री व काळ्या तिळाच्या तेलाबाबत मोठी फसवणूक होत आहे. नाल सिद्ध केलेली आहे, असे सांगून पाचशे ते एक हजार रुपये घेतले जातात. निर्णय कायमस्वरूपी राहावा.
– कौस्तुभ भाले (भाविक, औरंगाबाद)

Visits: 101 Today: 1 Total: 1110397

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *