संगमनेरातील सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेच्या वस्तू! लाखोंचा खर्च पाण्यात; पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षात अंधार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या गाजावाजासह लाखों रुपयांची उधळण करुन विसर्जन मिरवणुकीच्या मार्गासह शहरातील प्रमुख चौकात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता संगमनेरकरांसाठी शोभेची वस्तू ठरत आहेत. अवघ्या तिनच वर्षांपूर्वी मोठ्या समारंभातून या सुविधेचे लोकार्पण झाले होते. त्याद्वारे शहरातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवण्याचे प्रकार, दुचाकी चोरीच्या घटनांसह चोरीचे तपास आणि वारंवार तुंबणार्‍या वाहतुकीतून संगमनेरकरांची सुटका होईल अशीच सर्वांना आशा होती. मात्र आता ती फोल ठरल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे बघायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे या कॅमेर्‍यांनी टिपलेल्या गोष्टी शहर पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचतच नसल्याचेही समोर आले असून सध्या या कक्षाचा वापर ताब्यात घेतलेल्या आरोपींना बसवून ठेवण्यासाठी केला जात आहे.


शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा वापर करुन संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गासह प्रमुख रस्ते, चौक व परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. शहरातील प्रत्येक घटना आणि घडामोडींवर थेट नियंत्रण मिळवता यावे यासाठी या सर्व कॅमेर्‍यांद्वारे होणारे थेट प्रसारण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आले. त्यासाठी ठाण्याच्या एका भागात नव्याने नियंत्रण कक्षाची निर्मिती करुन तेथे मोठ्या आकाराचे टीव्ही संचही बसवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून 19 फेब्रुवारी 2022 रोजी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या शानदार समारंभात या सुविधेचा लोकार्पण सोहळाही पार पडला.


त्यावेळी पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षात पूर्णवेळ कर्मचार्‍याची नियुक्ति करण्यासह 24 तास या कॅमेर्‍यांद्वारा होणार्‍या चित्रणावर पोलिसांचा ‘वॉच’ राहील असे ठासण्यात आले होते. पोलिसांकडून कॅमेरे तर बसवले जातात, मात्र ते खराब झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यात चालढकल होत असल्याची बाब ठिकठिकाणी समोर आल्यानंतर संगमनेरच्या या सुविधेला दोन वर्ष ठेकेदाराच्या दुरुस्तीचे कवचही देण्यात आले. विशेष म्हणजे या कॅमेर्‍यांमध्ये उच्चश्रेणीच्या आणि 360 अंशात पाहु शकणार्‍या कॅमेर्‍यांचाही समावेश असल्याने त्यांचा वापर करण्यात सुरुवातीचा काहीकाळ तत्कालीन पोलीस अधिक्षकांनी सांगितल्यानुसार घडलेही. मात्र त्यानंतर कॅमेरे नादुरुस्त होण्यासह त्यांची दुरावस्थाही सुरु झाली.


आजच्या स्थितीत शहरात प्रशासनाकडून लावण्यात आलेले अनेक कॅमेरे नादुरुस्त असून 360 अंशात फिरणारे कॅमेरेही आता एकाच जागी स्थिरावले आहेत. धक्कादायक म्हणजे लाखों रुपयांची उधळण करुन या सर्व कॅमेर्‍यांनी टिपलेले छायाचित्रण ज्या ठिकाणी थेट बघण्याची व्यवस्था केली गेली त्या शहर पोलीस ठाण्याच्या नियंत्रण कक्षातच ते पाहणं बंद झालं असून सद्यस्थितीत तांत्रिक बिघाडामुळे त्याचे प्रसारणही थांबले आहे. त्यामुळे आजचा विचार करता शहरातील चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यांवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे संगमनेरकरांसाठी शोभेच्या वस्तू ठरले आहेत.


जवळपास तीन वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेल्या या कॅमेर्‍यांचा सुरुवातीचा कालावधी वगळता पोलिसांकडून कधीही प्रभावी वापर झाल्याचे ऐकिवात नाही. शहरात आजही वेगवेगळ्या भागात महिलांची सुरक्षा ऐरणीवरच असून सोनसाखळ्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. याशिवाय छत्तेट्या-मोठ्या चोरीच्या घटना, घरफोड्या आणि मोटर सायकल चोरीच्या प्रकारांमध्ये कोणतीही घट झालेली नसून उलट दिवसोंदिवस अशा घटनांचा आलेख चढताच आहे. घटनेनंतर तपासासाठीही सीसीटीव्हीचा प्रभावी वापर होतो, मात्र संगमनेरात या कॅमेर्‍यांचा वापर करुन पोलीस आरोपींपर्यंत पोहोचल्याचेही उदाहरण दुर्मिळच आहे. नागरी करातून मिळालेल्या निधीची अशा पद्धतीने होत असलेली उधळपट्टी मात्र संगमनेरकरांच्या संतापाचे कारण ठरत आहे.

नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव असला की काय घडते याची एकामागून एक उदाहरणे संगमनेर शहरातून समोर येत आहेत. यापूर्वी पालिकेने कोणताही विचार न करता, पोलिसांच्या सूचना ऐकून न घेता केवळ ठेकेदार आणि कमिशन या सूत्राला समोर ठेवून पुणे-नाशिक आणि कोल्हार-घोटी या महामार्गांवर शहरातंर्गत 35 लाख रुपयांचा खर्च करुन पाच ठिकाणी सिग्नल व्यवस्था उभारण्यात आली होती. मात्र ती सदोष असल्याने आजवर त्याचा कधीही वापर केला गेला नाही. आता लोखोंचा खर्च करुन उभारण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाही त्याच मार्गावर असल्याचे धक्कादायक चित्र सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 80024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *