स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व हिमालयाच्या उंचीचे ः जाखडी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर केली जोरदार टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व हिमालयाच्या उंचीचे आहे. त्यांनी व त्यांच्या संपूर्ण परिवाराने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या अतोनात हालअपेष्टा व सर्वस्वाचा केलेला त्याग हे जागतिक स्तरावर अभ्यासले जाणारे दुर्मिळ उदाहरण आहे. सावरकर म्हणजे भारतमातेच्या मुक्तीसाठी प्राणपणाने लढणार्या सर्व क्रांतिकारकांचे मुकुटमणी आहेत. सावरकरांनी व त्यांच्या बंधूंनी देखील स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून देऊन सर्वस्वाचा होम केला. घरादाराची राखरांगोळी करून घेतली. त्यांच्याविषयी हलक्या बुद्धीने काहीही उद्गार अथवा अवमानकारक वक्तव्य करणारे राहुल गांधी यांची राजकीय कारकीर्द व भविष्यात कदाचित त्यांचा पक्ष देखील नामशेष होईल. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आहे व तसेच राहील असे मत पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातून निषेध झाला पाहिजे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विकृत वक्तव्य करीत असताना त्यांच्या सोबत तथाकथित भारत जोडो यात्रेत असणार्या महाराष्ट्रातील नेत्यांना जनाची नाही निदान मनाची तरी वाटायला हवी होती. त्यांनी जागीच यात्रा सोडून निषेध दाखवून द्यायला हवा होता व महाराष्ट्राची एकजूट व अस्मिता दाखवून द्यायला हवे होती. ज्या राहुल गांधींच्या पक्षाला सर्व देशाने झिडकारले आहे आणि ज्यांना अमेठी मतदार संघातील जनतेने दारुण पराभव करून घरी पाठविले आहे त्यांनी स्वतःची योग्यता व धोरण वागणूक तपासणे गरजेचे झाले आहे. केवळ घराणेशाहीमुळे पक्षात मिळालेले स्थान आणि मान पचविता न आल्याने राहुल गांधी फक्त आता वायफळ बोलणारे झालेले आहेत. भारत जोडो असे म्हणता म्हणता लक्षावधी मराठी माणसांचे श्रद्धास्थान असलेल्या सावरकर यांच्याविषयी विषारी गरळ ओकून मने तोडणारी ही यात्रा ठरली आहे. भविष्यात देखील त्यांनी स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवणे आवश्यक आहे.

मुळात सावरकर यांच्याविषयी बोलण्याची पात्रता, योग्यता त्याग आणि उंची यापैकी काहीही ज्या माणसाकडे नाही त्याने सावरकर नावाच्या क्रांतीच्या मशालीला हात लावणे हीच सर्वात मोठी घोडचूक केली असून येणारा काळ राहुल गांधींच्या पक्षाला धडा शिकविणारा असेल हे मात्र नक्की. महाराष्ट्रातील तरुण वर्गात मोठी संतापाची लाट असून त्याचे परिणाम राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला नक्कीच भोगावे लागणार आहेत असा गर्भीत इशारा भाऊ जाखडी व उपाध्यक्ष संदीप वैद्य यांनी दिला आहे.
