कोविडमध्ये जीव गमावलेल्या सहकारी बँकांच्या कर्जदाराचे ‘ऋण’ माफ! सहकार आयुक्तांचे सहकारी बँकांना आदेश; मालमत्ता तारण असलेल्या कर्जदारांचा समावेश


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या दोन वर्षांच्या कालखंडात देशभरातील लाखों नागरिकांचा संक्रमणातून बळी गेला. अनेक कुटुंबांचा आधारच कोविडने हिरावल्याने त्यांच्यावर तर आभाळच कोसळले. काहींचे आई-वडील दोघेही कोविड संक्रमणात मृत्यू पावल्याने त्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली. असंख्य वेदनादायी घटनांच्या नोंदी घेवून सरलेल्या त्या कालखंडातून सावरलेल्यांना मात्र जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता अशा नागरिकांना राज्य सरकारच्या सहकार विभागाने मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडच्या काळात संक्रमण होवून घरातील कर्ता मनुष्य बळी पडला असेल आणि त्याची मालमत्ता जर सहकारी बँकांकडे तारण असेल तर त्याची संपूर्ण माहिती प्राधान्याने सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांना बजावले आहेत. त्यामुळे तारणी कर्ज असलेल्या अशा कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत पुण्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी शुक्रवारी (ता.11) यासंदर्भातील आदेश बजावले. त्यानुसार कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. कोरोना कालावधीमध्ये घरातील कर्ता पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबांना मोठी आर्थिक झळ बसलेली आहे. मयत कर्जदाराचे राहते घर अथवा इतर मालमत्ता तारण असल्यास अशावेळी त्यांचे कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

सबब, प्रामुख्याने मागील कोरोना संक्रमणाच्या कालावधीत कोविडमुळे निधन झालेल्या व मालमत्ता तारण असलेल्या आपल्या विभागातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्थांमधील थकीत कर्जदारांची विहीत नमुन्यात माहिती भरुन ती लवकरात लवकर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या सहकार विभागाने उचललेले हे पाऊल निश्चितच अशा कुटुंबांना मोठा दिलासा ठरणार आहे. या भयानक कालखंडात उपचारांसाठी अनेकांनी कर्ज घेतले, मात्र तरीही रुग्णाला वाचवू शकले नाहीत. काहींनी खासगी सावकारांकडूनही कर्ज घेतल्याची प्रकरणं आहेत. परतफेड होत नसल्याने त्यांच्याकडूनही मनमानी पिळवणूक सुरु आहे. त्यांनाही दिलासा मिळण्याची गरज आहे.

Visits: 170 Today: 3 Total: 1101081

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *