स्वच्छ भारत सर्वेक्षणात संगमनेर नगर परिषदेचा देशात तिसरा क्रमांक! संगमनेरकरांचा गौरव वाढवणारा पुरस्कार; कचरा मुक्त शहरातंर्गत थ्री स्टारचे मानांकन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील नागरीकांना मुलभूत सुविधा पुरवतांना दैनंदिन स्वच्छता, नियमीत घंटागाड्यांची व्यवस्था, सातत्यपूर्ण प्रयत्नातून नागरीकांकडून ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण, जमा होणार्‍या घनकचर्‍याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आणि त्यापासून शासनाने हरित ब्रँड म्हणून गौरविलेल्या कंपोस्ट खतांची निर्मिती आणि हरित शहराच्या संकल्पनेतून शहरात चौफेर झालेले वृक्षारोपण आणि संवर्धन या बळावर संगमनेर नगर परिषदेने स्वच्छ भारत सर्वेक्षण 2022 मध्ये थ्री स्टारचे मानांकन मिळवतांना पश्‍चिम विभागात देशात तिसरा क्रमांक पटकाविल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.


केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर देशातील सर्व घटक राज्यातील नगर परिषदांसाठी ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण 2022’ अभियान राबविले होते. त्यात सहभागी होतांना संगमनेर नगर परिषदेच्या सर्वेक्षणाच्या कालावधीत आवश्यक निकषांची पूर्तता करण्यासह शहरी नागरीकांना मुलभूत सुविधा पुरवतांना घनकचर्‍याचे सुयोग्य व्यवस्थापन करीत कचरा कुंडी मुक्त संगमनेर अभियान चालविले. त्यासाठी शहरातील प्रभागनिहाय प्रत्येक गल्ली, चौक, रस्ते व परिसरात नियमीत घंटागाड्यांची व्यवस्था केली. पालिकेच्या या प्रयत्नांना संगमनेरकर नागरीकांनीही तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे घरातूनच ओला आणि सुका कचर्‍याचे वर्गीकरण होवून जमा झालेला कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून संकलित करुन त्यावर संगमनेर खुर्दच्या कंपोस्ट डेपोमध्ये प्रक्रिया केली जाते.


या प्रक्रियेतून तयार होणारे कंपोस्ट खत अतिशय दर्जेदार असून शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे समोर आल्याने राज्य सरकारने पालिकेच्या कंपोस्ट खताला ‘हरित ब्रँड’ म्हणून मान्यताही दिलेली आहे. ‘स्वच्छ, सुंदर व हरित शहर’ ही संकल्पना घेवून माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी आपल्या कार्यकाळात त्यावर मोठे काम केल्याने शहरात स्वच्छतेसोबत वृक्षांचीही संख्या वाढली आहे. या सर्व गोष्टींच्या जोरावर यापूर्वी पालिकेने केंद्र व राज्य सरकारचे अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. त्यात प्रामुख्याने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता पुरस्कार, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार, स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत जीएफसी स्टार रेटींग, ओडीएफ++ अंतर्गत पश्‍चिम विभागात देशात पाचवा क्रमांक,


अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महिला व बालकल्याण विभागाचा उत्कृष्ट नगरपरिषदेचा पुरस्कार व माझी वसुंधरा अभियानात मिळालेला दुसरा क्रमांक यामुळे संगमनेर नगरपरिषदेने देशात लौकीक मिळवला आहे. आता स्वच्छ भारत सर्वेक्षण 2022 अंतर्गत संगमनेरचा समावेश कचरामुक्त शहरात होण्यासह त्यात थ्री स्टार मानांकनही प्राप्त झाल्याने संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. संगमनेरकर नागरीकांच्या सहकार्याने पालिकेने मिळवलेला हा बहुमान शहराचा गौरव वाढवणारा आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानात संगमनेर शहरातील नागरीक, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व स्वच्छतेच्या बाबतीत पालिकेच्या सूचनांचे पालन केले. त्यामुळे स्वच्छता अभियानासह माझी वसुंधरा अभियानातही पालिकेला खूप चांगले काम करता आले. संगमनेरकरांच्या सहकार्याच्या जोरावर यापुढेही स्वच्छतेची ही चळवळ अशीच जोमात सुरु राहील व स्वच्छ आणि हरित शहराचे स्वप्नंही प्रत्ययात उतरेल असा मला ठाम विश्‍वास आहे.
राहुल वाघ
मुख्याधिकारी : संगमनेर नगरपरिषद

संगमनेर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानात पश्‍चिम विभागात देशात तिसरा क्रमांक मिळवणे ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानास्पद बाब आहे. यासर्व प्रक्रियेत संगमनेरकर नागरीकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले, त्यामुळे पालिका हे यश मिळवू शकली. या मानांकनाने पालिका प्रशासन आणि नागरीक अशा दोहोंचाही उत्साह वाढला असून यापुढील कालावधीत स्वच्छतेबाबत आणखी जोरकसपणे काम करुन संगमनेर नगरपरिषदेला पहिल्या क्रमांकाचे मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
डॉ.शशीकांत मंगरुळे
प्रांताधिकारी तथा प्रशासक : संगमनेर नगर परिषद

Visits: 37 Today: 2 Total: 115240

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *