संगमनेरच्या हनुमान रथातून घडले स्थानिकांच्या कलाविष्काराचे दर्शन! सव्वाशे वर्षांपूर्वी खरे बांधवांनी कोरलेल्या रथावर यंदा उमटली सुनील मादास यांच्या ब्रशची छटा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रगल्भ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या संगमनेरातील श्री हनुमान विजयरथाचा प्रसंगही मोठा रोमांचकारी आहे. अगदी शिवकालाच्या आधीपासून शहरात साजर्या होणार्या या ग्रामोत्सवात भव्य स्वरुपातील रथ असावा या कल्पनेतून सन 1905 साली संगमनेरातील नावाजलेले कलाकार नामदेव व सुंदरराव खरे (मिस्तरी) यांच्या कलाकारीतून सिसम लाकडाचा वापर करुन रथ तयार केला गेला. तेव्हापासून गेली 117 वर्ष हाच रथ संगमनेरच्या हनुमान जयंतीचे प्रतिक बनला आहे. यावर्षी या विजय रथाचा मूळ ढाचा कायम ठेवून त्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे. त्या निमित्ताने एकीकडे संगमनेरच्या सांस्कृतिक वारशाचे तर दुसरीकडे खरे बांधवांच्या प्रगल्भ कलाविष्काराचे दर्शन घडले आहे.

संगमनेरात साजर्या होणार्या विविध सार्वजनिक उत्सवांना मोठी परंपरा लाभली आहे. त्यातील श्री हनुमान जन्मोत्सव आणि त्या निमित्ताने काढल्या जाणार्या रथयात्रेला तर मोठा रंजक आणि रोमांचकारी इतिहास आहे. सशस्त्र ब्रिटीशांचा बंदी हुकूम पायदळी तुडवित संगमनेरच्या झुंझार महिलांनी या उत्सवाची नोंद इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी केली आहे. तेव्हापासून हनुमान जनमोत्सवाच्या दिनी काढल्या जाणार्या रथोत्सवाचे नामकरणही ‘श्री हनुमान विजयरथ’ असे झाले आहे. संगमनेरात राहणार्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात स्थान असलेल्या या रथोत्सवात वापरल्या जाणार्या रथालाही 117 वर्षांचा मोठा इतिहास आहे.

शिवकालाच्या पूर्वापार चालत आलेल्या संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सवाला विसाव्या शतकाच्या प्रारंभी कलाटणी मिळाली. त्याकाळच्या समाज धुरीणांनी हा ग्रामोत्सव अधिक धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी नव्याने भव्य रथाची संकल्पना मांडली आणि त्यावेळी संगमनेरच्या कलाविश्वात नावाजलेल्या नामदेवराव सखाराम खरे व सुंदरराव गोविंदराव खरे (मिस्तरी) या भावंडांनी ती प्रत्यक्षात उतरविली. सन 1905 साली सिसम लाकडाचा वापर करुन या दोघा भावांनी अवघ्या दोन वर्षात आज आहे त्या रथाची निर्मिती केली. या रथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रथाच्या मध्यभागात दर्शनी असलेल्या दोन खांबांवर एकाबाजूला स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसर्या बाजुला महात्मा गांधी यांची प्रतिमाही कोरण्यात आली. 2007 सालच्या हनुमान जन्मोत्सवात पहिल्यांदाच या रथाचा समावेश झाला तो आजतागायत अव्याहत आहे.

पुढे सन 1992 साली रथाच्या खालच्या बाजुचा भाग काहीसा खराब झाल्याने श्रीराम व हनुमान जयंती उत्सव समितीचे तत्कालीन प्रमुख (स्व.) कुंदनसिंह परदेशी, विनय गुणे, सोमनाथ पराई, कमलाकर भालेकर यांनी शहरातील कोतुळेश्वर इंडस्ट्रिज याठिकाणी पहिल्यांदा त्याचे किरकोळ स्वरुपातील काम करण्यात आले. त्यानंतर गेल्यावर्षीच्या हनुमान जयंती उत्सवानंतर या ऐतिहासिक रथाला नव्याने झळाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुण्याच्या समर्थ वूड काविंग सेंटरची निवड करण्यात आली. गेले वर्षभर या रथाच्या मजबुतीकरणासह त्यावरील नक्षीकामालाही पुन्हा एकदा कोरण्यात आले, त्यातून या रथाचे रुपडेच बदलले आहे.

हनुमानाचा जन्मोत्सव पार पडल्यानंतर गावातून या रथाची सवाद्य शोभायात्रा काढली जाते. त्यासाठी रथाची निर्मिती करताना खरे मिस्तरी बांधवांनी उंबराच्या लाकडाचा वापर करुन हनुमानाची मूर्तीही तयार केली होती, आजही हिच मूर्ती या उत्सवासाठी वापरली जाते. रथाच्या नूतनीकरणासह यंदा या मूर्तीलाही गतवैभव प्राप्त झाले आहे. त्याची जबाबदारी अलिकडच्या काळातील संगमनेरातील सुपरिचित असलेले कलाकार सुनील मादास यांनी संपूर्ण साहाय्य केले. जवळपास 118 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या लाकडी मूर्तीच्या मूळ रचनेला कोणताही धक्का न लावता मादास यांनी अतिशय अवघड आणि क्लिष्ट असलेले काम वेळेत पूर्ण केले. त्यासाठी वापरण्यात आलेले संपूर्ण साहित्य उच्च क्षमतेचे असल्याने पुढील शंभर वर्ष या मूर्तीला रंग देण्याशिवाय काही करावे लागणार नाही.

यासोबतच प्रत्यक्ष रथावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या लाकडी प्रतिमाही सुनील मादास यांनी नव्याने उजाळल्या आहेत. त्यांनी केलेले कोरीव आणि शास्त्रोक्त काम महाबली हनुमानासह या दोन्ही विभूतींच्या मूर्त्या जिवंत करणारा ठरला आहे. यावर्षीची शोभायात्रा नूतनीकरण झालेला रथ आणि त्यावरील मूर्त्यांच्या माध्यमातून संगमनेरच्या ऐतिहासिक आणि सांकृतिक परंपरेसह कलाकारांच्या प्रगल्भ वारशाचेही दर्शन घडवणारी ठरणार आहे. या ग्रामोत्सवात संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई व उपाध्यक्ष कमलाकर भालेकर यांनी केले आहे.

गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी श्री हनुमान रथोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त पहाटे 6 वाजता हनुमानाच्या जन्मानंतर सकाळी साडेआठ वाजता चंद्रशेखर चौकातून रथयात्रेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी परंपरेप्रमाणे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे संपूर्ण शासकीय पोशाखात वाद्यवृंदासह मानाचा ध्वज या रथावर चढवतील व त्यानंतर महिलांच्या हस्ते रथाची चाके ओढली जावून या ऐतिहासिक उत्सवाला सुरुवात होईल. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

