खग्रास चंद्रग्रहणामुळे साईंच्या दैनंदिन वेळेत बदल साईभक्तांनी सहकार्य करण्याचे संस्थानचे आवाहन
नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईबाबा संस्थानच्यावतीने मंगळवारी (ता.8) खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला असून दुपारी 2.30 ते सायंकाळी 6.19 यावेळेत श्रींच्या समोर मंत्रोच्चार होणार असल्यामुळे भाविकांना समाधी मंदिराच्या सभामंडपापासून दर्शन सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना बानायत म्हणाल्या, 8 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 6.19 या काळात खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित) आलेले आहे. यामध्ये दुपारी 2.30 वाजता श्रींचे दर्शन बंद होईल, दुपारी 2.39 वाजता समाधी मंदिरात मंत्रोच्चार सुरू होईल. सायंकाळी 6.19 वाजता मंत्रोच्चार संपल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता श्रींचे मंगलस्नान होईल. त्यानंतर सायंकाळी 6.45 वाजता श्रींची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होईल. सायंकाळी 7 वाजता श्रींची धूपारती होईल. आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगा पूर्वीप्रमाणे सुरू होईल. तसेच सदर ग्रहण काळात श्रींच्या समोर मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराच्या सभामंडपापासून दर्शन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगून सर्व साईभक्तांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही बानायत यांनी केले आहे.