तांभेरे जिल्हा बँकेच्या शाखेतही बनावट दागिने ठेवून सोनेतारण… राहुरी पोलिसांत वीस जणांविरुद्ध फसवूणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तांभेरे (ता.राहुरी) शाखेत 1 सप्टेंबर, 2019 ते 1 जानेवारी, 2020 दरम्यान बनावट दागिने तारण ठेवून सोनेतारण कर्ज घेतलेल्या 20 जणांविरुद्ध 27 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी (ता.16) राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोनगाव पाठोपाठ बँकेच्या तांभेरे शाखेतही बनावट सोनेतारण कर्ज प्रकरण उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सोनगाव शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला बँकेचा सुवर्णपारखी अरुण नागरे हाच तांभेरे येथील शाखेतही सुवर्णपारखी होता. त्यानेच संगनमताने हा गैरप्रकार केल्याचे समोर आले. तांभेरे शाखेत 90 जणांना सोनेतारण कर्जवाटप केले होते. त्यांपैकी 37 जणांच्या सोन्याची सत्यता पडताळणी 28 व 30 डिसेंबर 2020 रोजी झाली. त्यांतील 33 जणांनी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट आढळले.

13 जणांनी बँकेचे कर्ज व व्याजाची काही रक्कम जमा केली. उर्वरित 20 जणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बँकेचे शाखाधिकारी भाऊसाहेब वर्पे (वय 59, रा.कोल्हार खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे करीत आहेत.

आरोपींची नावे…
प्रकाश गीताराम पठारे, पूजा नवनाथ पठारे, मंदाबाई गोपीनाथ पठारे, मनीषा राहुल पठारे, राहुल गोपीनाथ पठारे, नवनाथ गोपीनाथ पठारे, बाबासाहेब सखाहरी पठारे, राहुल शांताराम नालकर, अश्विनी बाळासाहेब पवार, रवींद्र बाळासाहेब पवार, संजय शंकर चिकणे (सर्व रा.लक्ष्मीवाडी, रामपूर), सुनील उत्तम सरोदे, अनिल उत्तम सरोदे (रा.तांदूळनेर), प्रवीण अरुण शिरडकर, माया राजेंद्र येळे (दोघेही रा.कोल्हार खुर्द), अरुण बाळासाहेब शिंदे (रा.रामपूर, हल्ली रा.पाथरे, ता.राहाता), शुभम अंबादास येळे (रा.कानडगाव, हल्ली रा.हनुमंतगाव, ता.राहाता), संदीप बाळासाहेब अनाप (रा.अनापवाडी, सोनगाव), पोपट काशिनाथ थोरात (रा.सात्रळ), गोरक्ष राधूजी जाधव (रा.माळेवाडी-डुक्रेवाडी) हे सर्व आरोपी पसार आहेत.
