आजच्या तरुणाईला असलेले जंकफूडचे आकर्षण घातक ः लिमये कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; खाद्यसंस्कृतीतून उलगडला उद्योजकाचा जीवनप्रवास


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रवासी आणि आतिथ्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहे. भारत हा विविध संस्कृती आणि नैसर्गिक संसाधनांनी भरलेला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने जगातील नागरिकांना भारताचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. पर्यटनातून अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते. श्रीलंका, थायलंड, दुबई सारख्या जगातील अनेक देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. आपला देश निसर्ग सौंदर्यासह पराक्रमी इतिहासाच्या खुणांनी भरलेला असतानाही पर्यटन क्षेत्रात आपण म्हणावे तसे काम करु शकलो नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेला बुस्टर द्यायचा असेल तर पर्यटन क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष्य देण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय पाकतज्ज्ञ नीलेश लिमये यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवसाचे पुष्प गुंफतांना ‘खाण्यासाठी जगणे आपुले’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे होत्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी, उपाध्यक्ष अरुण ताजणे, वास्तु विशारद रवी जोशी आदी यावेळी मंचावर होते. प्रतिष्ठानच्या सदस्य व पत्रकार स्मिता गुणे यांनी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पाकतज्ज्ञ नीलेश लिमये यांना महिलांच्या मनातील प्रश्नांवर बोलते केले.
देश-विदेशातील नामांकित हॉटेल्समध्ये आपल्या हातच्या चवीचा दरवळ पसरवणार्‍या शेफ लिमये यांनी चुलीवरील जेवणातून रसिकांना खाद्य जगात नेले. पूर्वी आईने चुलीवर तयार केलेल्या जेवणाची चव आणि त्यातील सात्त्विकता आजही आपल्या प्रत्येकाच्या जीभेवर तरवळते. मनातील भाव आणि वात्सल्याच्या वर्षावातून तयार झालेल्या त्या जेवणाने पोटं भरल्यासारखे वाटे, समाधानाचा ढेकरं देवूनच आपण ताटावरुन उठायचो अशी आठवण सांगत त्यांनी उपस्थितांना भूतकाळात डोकावण्यास भाग पाडले.

जग सारखं बदलतं असतं. आपल्या भोवतालची स्थिती आणि संसाधनात वारंवार बदल होत असतात. त्यानुसार पूर्वीच्या स्वयंपाक बनविण्याच्या पद्धतीत आज मोठे बदल झाले असले तरीही त्यातून आपल्या खाद्य संस्कृतीला मात्र तिळमात्र धक्का लागलेला नाही. चूल आणि गॅस यावर तयार होणार्‍या जेवणाच्या चवीत खूप मोठा फरक असतो. पण आता चुलीचा काळ जावून गॅस, वीजेवर चालणार्‍या शेगड्या अशा आधुनिक साधनांचा वापर करुन महिला स्वयंपाक करु लागल्या आहेत. आईकडून आलेल्या परंपरेला पुढे नेतांना आजच्या सगळ्याच भारतीय महिला सुगरणीप्रमाणे जेवणं तयार करण्यात वाक्बदार आहेत. म्हणूनच भारतीय खाद्यसंस्कृतीचे जगाला नेहमीच आकर्षण राहील्याचे पाकतज्ज्ञ लिमये म्हणाले.

आजच्या तरुणाईमध्ये घरातील पोषक अन्नापेक्षा पिझ्झा आणि बर्गरसारख्या जंकफूडचे अधिक आकर्षण आहे. घरातील अन्न पदार्थांच्या सेवनातून शरीराला आवश्यक घटक मिळतात, मात्र अशाप्रकारचे बाहेरचे पदार्थ शरीराला अपायकारक ठरु शकतात. आजकाल आई-वडिलही आपल्या मुलांना असे पदार्थ खाऊ घालण्यात आघाडीवर असल्याचे दिसते. हा प्रकार अयोग्य असून जंकफूडचे आकर्षण कधीही पोषक ठरणार नसल्याचा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. आपल्या देशात विभिन्न संस्कृतींचे दर्शन घडते. वेगवेगळ्या राज्यांची जशी वेशभूषा न्यारी असते, तशीच त्या प्रदेशाची वेगळी अशी खाद्यसंस्कृतीही असतेच असे सांगत लिमये यांनी देशातील वेगवेगळ्या राज्यांची आणि तेथील नैसर्गिक रचनेनुसारच्या आहाराची आणि व्यंजनांची सविस्तर माहितीही दिली. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मिसळ आणि मूगाच्या डाळीची खिचडी सर्रास खाल्ली जाते, त्या पद्धतीने दक्षिणेकडील राज्यात तांदळापासून तयार होणारे हलके पदार्थच प्रचलित असतात याकडे त्यांनी रसिकांचे लक्ष्य वेधले.

राज्यात सध्या सरपंच थाळी आणि रावण थाळीचा खूपच अतिरेक झाला आहे. ‘चवीने खातो, त्याला देव देतो’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित असल्याचे सांगत त्यांनी घरातही वाढतांना किती वाढायचे आणि किती खायचे हे निश्चित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. पूर्वी वर्षभरातील ऋतूमानानुसार घरातील जेवणाचे पदार्थ बनविले जात होते. मात्र आज यासर्व गोष्टी मागे गेल्या असून बाराही महिने मनाला वाटेल त्या पदार्थांवर ताव मारणारी नवी संस्कृती जोमाने वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हॉटेलमध्ये शेफला एखादी डीश बनवायची असेल तर त्याला अगोदरच तयारी करावी लागते. हॉटेलमध्ये एखाद्यावेळी जास्त ग्राहक आले तर शेफची मोठी धावपळ होते. कमी वेळेत अधिक ग्राहकांच्या वेगवेगळ्या व्यंजनांच्या ऑर्डर पूर्ण करण्याचे लक्ष्य असते. अशा प्रसंगातही शेफने चांगले जेवण तयार करुन दिले तर त्याचे कधीही कौतुक होत नाही. मात्र चुकून अशा धावपळीत एखादी भाजी खराब झाली तर ग्राहक मालकाकडे तक्रार करुन लागलीच समोर बोलावून त्याचा पानउतारा केला जातो अशी शोकांतिकाही त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडली.

अध्यक्षीय भाषणात माजी नगराध्यक्ष तांबे म्हणाल्या की, गॅसपेक्षा चुलीवरच्या जेवणाची चव एकदम वेगळीच असते. मात्र आता घरोघरी गॅस आल्याने चुलीवरच्या जेवणाची चव लृप्त होवू लागली आहे. बाहेरील जेवणात मसाल्यांचा भरपूर वापर केला जातो, त्यामुळे ते जेवण चमचमीत जरी वाटतं असले तरीही त्यातून आरोग्यावर विपरित परिणाम होतात. घरातील जेवण बाहेरच्या तुलनेत कमी मसालेदार असले तरीही ते शरीराला पोषक असल्याने बाहेरचे अन्न खाण्याचे टाळावे असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.


लेखक, उद्योजक आणि दूरचित्रवाहिन्यांच्या विविध कार्यक्रमात नेहमी दिसणारा चेहरा असलेल्या शेफ नीलेश लिमये यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. तब्बल 25 वर्षांच्या पाककलेतील समृद्ध अनुभवानंतर त्यांनी उद्योग विश्वात पाऊल ठेवले आणि ‘ऑन बाऊट कुकींग’ हे व्हेन्चर सुरु केले. लिमये यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली असून ते नैसर्गिक आणि ओरिजनल कुकींगचे खंदे समर्थक आहेत. महाराष्ट्रीयन पाककृतीसह प्रादेशिक पाककृतीच्या सुधारणांसाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या या आंतरराष्ट्रीय शेफच्या जीवनातील विविध प्रसंगांना स्पर्श करणार्‍या प्रश्नातून स्मिता गुणे यांनी शेफ नीलेश लिमये यांच्या मुखातून आजच्या व्याख्यानमालेचा सार वाहता केला.

Visits: 112 Today: 1 Total: 1112424

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *