पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाकडून गुटखा तस्कर चितपट! मुद्देमालासह जागीच पकडला; तीस हजारांच्या गुटख्यासह सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात प्रतिबंधीत असूनही राजरोस उपलब्ध होणार्या गुटख्यावर संगमनेरात पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर उपविभागाचा प्रभार असलेल्या शिर्डीच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या आदेशावरुन त्यांच्या पथकाने शहरानजीकच्या गुंजाळवाडी शिवारात ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दिलीप सहादु शिंदे या गुटखा तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्या मालकीच्या वाहनात दडवून ठेवलेल्या सुमारे 30 हजारांच्या गुटख्यासह सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला पाचारण करुन कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या गुंजाळवाडी शिवारातील युनिकॉर्न सोसायटी येथील घरावर छापा घातला.

यावेळी त्याच्या मालकीच्या ह्युंदई सॅन्ट्रो (क्र.एम.एच.02/ए.के.8770) या कारमध्ये 18 हजार 960 रुपये किंमतीचा हिरा कंपनीचा पानमसाला, 4 हजार 980 रुपये किंमतीची रॉयल 717 तंवाखू, 4 हजार 356 रुपयांचा विमल पानमसाला व 484 रुपयांची व्ही-वन नावाची सुगंधी तंबाखू अशा 28 हजार 780 रुपयांच्या गुटख्यासह 1 लाख रुपये किंमतीची कार असा एकूण 1 लाख 28 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी पो.कॉ.सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी दिलीप सहादु शिंदे (वय 32, रा.युनिकॉर्न सोसायटी, गुंजाळवाडी) याच्या विरोधात भा.द.वी.कलम 188, 272, 273, 328 सह अन्न व मानके कायदा नियमाचे कलम 59, 26 (2), (खत) प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पदोन्नतीवरील बदलीनंतर संगमनेरातील अवैध व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रभारी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी त्या विरोधात कारवाया करण्यास सुरुवात केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत पो.ना.अण्णासाहेब दातीर, पो.कॉ.सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव, गणेश शिंदे आदींचा समावेश होता.

