माळवाडगाव येथून पंचवीस सोयाबीन कट्ट्यांची चोरी श्रीरामपूर तालुका पोलिसांत चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
खरीप हंगामात नव्याने काढणी केलेल्या सोयाबीन चोरीचे सत्र सुरू असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे शेतकर्याच्या बंदिस्त शेडमधून लोखंडी जाळी तोडून 25 सोयाबीन कट्ट्यांची चोरी झाली आहे. यामुळे श्रीरामपूरच्या पूर्व गोदाकाठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
खरीपातील सोयाबीन काढणी काळात मागील वर्षी खोकर, भोकर, वडाळा महादेव परिसरात सोयाबीन चोरीच्या जबरी घटना घडल्या होत्या. सालाबादप्रमाणे यावर्षीही चोरट्यांनी सोयाबीन कट्टे कुठं शेतातूनच तर कुठं घरातल्या ओसरीतून तर खंडाळ्यात गोडावूनमधून रात्री चोरी करण्याच्या घटनेत खंड पडू दिला नाही. चार दोन कट्टे चोरीच्या घटना घडलेले त्रस्त शेतकरी पोलिसांत खबर देण्याच्या प्रयत्नात पडलेले नाहीत. दिवाळीपूर्वी रात्री मशिनवर सोयाबीन काढून कट्टे बारदान्याखाली झाकून थकलेले गोकुळ मुठे कुटुंब घरी जाऊन झोपले. सकाळी उठल्यावर सोयाबीन कट्टे आणण्यासाठी शेतात गेले तर पाच कट्टे गायब?
मुठेवाडगाव येथील घटनेने पंचक्रोशीतील शेतकर्यांनी तयार केलेल्या सोयाबीनचे कट्टे बर्यापैकी भाव येईपर्यंत तरी सुरक्षित ठेवण्याची काळजी घेतलेली असतानाच माळवाडगांव शिवारातील हरिगाव रस्ता वस्तीवर बाळासाहेब मारूती आसने यांच्या शेतासह राहत्या वस्तीलाही तार कंपाउंड, त्यात बंदिस्त शेडलाही दणकट जाळी असून त्यात सोयाबीनचे कट्टे सुरक्षित होते. मालकाच्या मनात यत्किंचितही चोरीची कल्पना नसताना बुधवारी (ता. 9) मध्यरात्रीच्या सुमारास शेडच्या मागील बाजूची जाळी तोडून 25 कट्टे अंदाजित 13 क्विंटल (रक्कम 62 हजार 500) चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी बाळासाहेब आसने यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ बर्डे हे पुढील तपास करत आहे.