मुक्या प्राण्यांची जीवनशैली समजून घेणे आवश्यक ः डॉ. जंगले कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; जंगली प्राण्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुक्या प्राण्यांना सुद्धा माणसांसारख्याच भावना असतात. त्यांच्या जीवन व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. प्राण्यांची जीवनशैली समजावून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या माजी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय अभ्यासक, लेखिका डॉ. विनया जंगले यांनी केले.
कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना ‘मुक्या वेदना, बोलक्या संवेदना’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन कल्पेश मेहता होते. यावेळी मंचावर कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी, उपाध्यक्ष अरुण ताजणे आदी उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना डॉ. जंगले म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पकडून आणलेले बिबटे मुंबईच्या बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले जातात. मात्र आजारी पडलेल्या बिबट्यांना रेस्क्यू पार्कमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. मनुष्य वर्ग वन्यप्राण्यांचा द्वेष करत असतो, मात्र छोट्या पिल्लांचा त्यामध्ये काहीच दोष नसतो. अशी छोटी पिल्लं कायमचीच पिंजर्यामध्ये का अडकवली जातात असा प्रश्न आपणास नेहमीच पडतो असे त्या म्हणाल्या.
बिबट्याला जेवढे तुम्ही घाबरतात त्या पेक्षाही जास्त तो तुम्हाला घाबरत असतो. बिबट्या कधीही थेट माणसावर हल्ला करीत नाही. असा अनुभव आल्यास लगेच घाबरुन न जाता एखाद्या ठिकाणी लपून बसून वनाधिकार्यांशी संपर्क साधायला हवा. अशा घटनांमधून पकडले गेलेले असंख्य बिबटे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले जातात. त्यामुळे भितीपोटी कोणी त्यांच्यावर हल्ला करणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. ज्या प्रमाणे एखादी जखम झाल्याने अथवा आजारपणात मानवाला वेदना जाणवतात, तशा त्या मूक्या जीवांनाही होतात. मात्र त्यांची भाषा आपल्याला समजत नसल्याने त्या आपल्याला कळू शकत नाहीत. या गोष्टी मी माझ्या कारकिर्दीत अनेकदा अनुभवल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी डॉ. जंगले यांनी भारताच्या विविध राज्यातून आणलेले बिबटे, मगरी, हत्ती, गिधाडं, चितळं, माकडं, मांजर, कासवं, उंट, घार, वटवाघूळ, फुलपाखरं, सिंह आणि पांढरे वाघ अशा सर्वांवरच राष्ट्रीय उद्यानात उपचार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. कर्नाटकमधून महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हत्ती शिरतात. हत्ती हा प्राणी असा आहे की माणूस त्याच्याशी प्रेमाने वागला तर तो देखील माणसाचा आदर करतो, मात्र त्याला त्रास दिला तर ते सूड घेतल्याशिवाय राहत नाहीत. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तिच्या निधनाने माणसाच्या संवेदना जागृत होतात, तशाच संवेदना हत्ती मेल्यानंतरही त्याच्या अन्य साथीदारांमध्येही त्या जागृत होत असल्याचे त्यांनी यावेळी सउदाहरण पटवून दिले.
भारतातील 99 टक्के गिधाडं नष्ट होत झाली आहेत. देशात आजच्या स्थितीत केवळ एक टक्काच गिधाडं शिल्लक राहिली आहेत. गिधाडे आपल्या देशातून का कमी होत आहेत याची कारणं शोधण्याची आज नितांत आहे. ब्रिटीश कालखंडात चितळं पाळली जात असतं. मात्र, इंग्रज देशातून निघून गेल्यानंतर त्यांची पाळीवं चितळं महापालिकेच्या ताब्यात दिली गेली. चितळ हा अतिशय घाबरट प्राणी आहे, मात्र त्याचवेळी तो तितकाच हुशारही असतो. उपचारांसाठी जेव्हा त्यांना बेशुद्धीच्या लशी दिल्या जातात, तेव्हा ते अधिकाधिक जागृत राहण्याचाच प्रयत्न करतात अशी अभ्यासपूर्ण माहितीही त्यांनी यावेळी संगमनेरकर रसिकांना दिली.