झाडं वाचवणारा माणूस! 27 हजार झाडांसाठीचा संघर्ष; केंद्रीय यंत्रणेलाही झुकवलं..

श्याम तिवारी, संगमनेर
वेड्या माणसांनी हे जग घडवलंय.. असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा एका ध्येयाचा पाठलाग करत ते साध्य करणार्या असामान्य माणसांची ती गोष्ट असते. बिहारच्या दशरथ दास मांझी यांनी तब्बल 22 वर्ष बलाढ्य डोंगराच्या छाताडावर घाव घालीत 360 फूट लांब आणि 30 फूट रुंदीचा रस्ता तयार करुन 60 गावांची पायपीट थांबवली. तर, आसामच्या जोरहाट परिसरातील ब्रह्मपुत्रेच्या खोर्यातील मजुली बेटावरच्या जादव मोलाई पायेंग यांनी चौदाशे हेक्टरच्या वाळवंटात सलग चाळीस वर्ष परिश्रम घेवून घनदाट जंगल निर्माण केले. या दोघांच्या असामान्य कर्तृत्वातून ‘एकटा माणूस काय करु शकतो?’ या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतांना आता संगमनेरातूनही असाच एक विलक्षण माणूस समोर आला आहे.

गणेश सुरेश बोर्हाडे म्हणजे ‘लेक लाडकी’ अभियानातून स्त्री भ्रृणहत्या रोखण्यासाठी धडपडणारा माणूस अशी त्यांची ओळख. चार वर्षांपूर्वी 2019 मध्ये अशाच कामाच्या निमित्ताने संगमनेरच्या प्रांत कचेरीत असतांना समोरच्या टेबलवर असलेल्या कागदांच्या गठ्ठ्यांवर त्यांची नजर खिळली. त्यातील एका गठ्ठ्यातील पहिल्या कागदावर ‘पुणे-नाशिक’ महामार्गाच्या चौपदरीकरणात तोडल्या गेलेल्या 2 हजार 373 झाडांच्या बदल्यात दहापट म्हणजे 23 हजार 730 झाडे लावण्याची अट घातलेला आदेश त्यांनी पाहिला. त्यातून त्यांचे वृक्षप्रेम जागृत झाले. सदरचा महामार्ग आणि त्यावरील टोल वसुली सुरु होवून काही वर्ष उलटूनही इतकी झाडे कोठे दिसत नसल्याच्या वास्तवाने त्यांच्या मनात काहूर माजवले.

त्यापूर्वी त्यांनी केवळ न जन्मलेल्या मुलींना वाचवण्याचे काम केलेले असल्याने पर्यावरण आणि त्या अनुषंगाने असलेले कायदे यांचे कोणतेही ज्ञान त्यांच्याकडे नव्हते. मात्र जेव्हा इतिहास घडवायचा असतो, तेव्हा इच्छाशक्तीच्या बळावर अज्ञानाचे रुपांतर आपोआप ज्ञानात होते. त्याप्रमाणे त्यांनीही ‘त्या’ आदेशाच्या आधारावर प्रांताधिकारी कार्यालय आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या त्यावेळच्या नाशिकमधील कार्यालयाकडून माहिती अधिकाराचा वापर करुन कागदपत्रं संकलित करण्यास सुरुवात केली. त्यातून प्राधिकरणाने या रस्त्याच्या कामात कर्हेघाट ते बोटाखिंड पर्यंत महामार्गाच्या दुतर्फा आणि मध्यभागी तितकी झाडे लावल्याची लेखी माहिती त्यांना दिली. ती वाचल्यानंतर प्राधिकरणाचा खोटारडेपणा बोर्हाडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रांताधिकार्यांच्या ‘त्या’ आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी अर्ज दाखल केला.

त्यांच्या अर्जावरुन तत्कालीन प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी प्राधिकरणाच्या अधिकार्यांसमवेत बोर्हाडे यांची बैठक घडवून आणली. त्या पहिल्याच बैठकीत केंद्रीय ‘अहं’ खिशात भरुन आलेल्या ‘त्या’ अधिकार्यांनी सुमारे चोवीस हजार झाडे लावल्याचा वारंवार उल्लेख करीत ती जगली नाहीत, त्यातली अनेक शेतकर्यांनी उपटून टाकली त्यात आमचा दोष काय? असे उलटे सवाल करीत बोर्हाडे यांनाच दबावात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा गोष्टीतून माघार घेईल ते प्रवरेची पाणी थोडेच असेल. याप्रमाणे अशा कितीही बैठका झाल्यात तरी त्यातून काहीच साधता येणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी झाडांशी संबंधित विषयांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची माहिती प्राप्त झाली.

मात्र न्यायाधिकणात लढण्याचा अनुभवही नाही, कोणाचे पाठबळही नाही आणि त्यासाठी लागणारा पैसाही नाही अशा त्रिशंकू अवस्थेत त्यांची गाडी रुतली. त्यातून मार्ग काढतांना त्यांनी मित्र-मंडळींकडून उसनवारी करुन काही रक्कम जमविली, त्याचवेळी त्यांना पुण्यातील पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर यांच्याविषयीची माहिती मिळाली. त्यांनी पुण्यात जावून त्यांची भेट घेतली आणि गोळा केलेल्या कागदपत्रांसह या विषयात निकराची लढाई लढण्याचा मनोदय व्यक्त केला. ग्रामीणभागातील एखादा तरुण झाडांसाठी लढतोय हे पाहून यादवाडकर यांनीही दिल्लीतील आपल्या ओळखीच्या वकिलांना फोन केला व त्यांना गणेश बोर्हाडे आणि 24 हजार झाडांचा विषय सांगितला. त्यांनाही बोर्हाडेंच्या लढ्याचे अप्रूप वाटल्याने फोेनवरुनच त्यांनी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देवून टाकले आणि तेथूनच बोर्हाडेंचा केंद्रीय प्राधिकरणाशी लढा सुरु झाला.

आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर अटी व शर्थीनुसारच्या झाडांसाठी राज्यातील पहिलीच याचिका राष्ट्रीय हरित लवादात दाखल झाली. त्याच्या नियमित सुनावण्या सुरु असतांनाच झाडांसाठी लढणार्या अभिनेते सयाजी शिंदे यांचीही या प्रकरणात त्यांना गरज भासली. त्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्यामार्फत व्हाया अभिनेते किशोर कदम यांच्याकडून सयाजी शिंदे यांची सातार्यात पहिलीच भेट घडली. त्यातून राज्यातील दोन वृक्षमित्र एकत्र आले आणि सातार्यात पोहोचेपर्यंत ‘संगमनेर’ इतकीच कक्षा असलेल्या बोर्हाडेंच्या वृक्ष तळमळीने मर्यादा ओलांडल्या आणि ती राज्यव्यापी झाली. त्यातूनच गेल्या महिन्यात रस्ता रुंदीकरणात जवळपास कत्तलीच्या वेदीवर आलेली पुण्याच्या खडकी भागातील नऊ वडाची झाडे या द्वयींनी वाचवली, या मोहिमेत त्यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांचीही साथ लाभली.

त्यापूर्वी अमृतवाहिनी महाविद्यालय ते रायतेवाडी फाटा रस्ता रुंदीकरणाच्या कामातही बोर्हाडेंचे वृक्षप्रेम संगमनेरकरांना अनुभवयास मिळाले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला ऑरेंज कॉर्नरसह शेतकी संघाजवळ असलेली वडाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आलेली होती. मात्र बोर्हाडे यांनी त्यात हस्तक्षेप करीत नागरी क्षेत्रातील पन्नास वर्षांहून अधिक जुनी झाडे तोडण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींवर बोटं ठेवतांना बांधकाम विभागाला झाडे तोडण्याच्या निर्णयापासून परावृत्त केले. यावेळी त्यांनी 50 वर्ष वयाचे झाड ‘हेरिटेज’ श्रेणीत येत असल्याचे व ते तोडायचेच ठरल्यास त्यासाठी असलेल्या नियमांची माहितीही दिल्याने पुढील चौपदरीकरणात वडाची झाडे वाचवण्याची ग्वाही तत्कालीन कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील, उपअभियंता सौरभ पाटील व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडून मिळाली.

पुणे-नाशिक महामार्गावर केवळ कागदावर लावलेल्या ‘त्या’ चोवीस हजार झाडांचा निर्णय दृष्टीपथात आहे. मात्र तत्पूर्वी झालेल्या शेवटच्या सुनावणीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने संयुक्त समितीला झाडे लावण्यास वन्यजीवांसाठी मार्ग निर्मिती व पाणी पुन:र्भरण प्रक्रियेबाबत (रेन हार्वेस्टिंग) काय कारवाई केली याबाबतच अहवाल येत्या दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वानुभव लक्षात घेवून प्राधिकरणाने स्वतः झाडे न लावता ती राज्याच्या वनविभागाकडून लागवड करुन घेण्याची आणि त्यांचे संगोपन करण्याची सूचनाही न्यायाधिकरणाने केली आहे. त्या बदल्यात वन विभागाला लागणार्या खर्चाचा अहवालही मागवण्यात आला असून त्यानुसार प्राधिकरणाकडून पैशांची वसुली करुन आता वन विभाग या महामार्गावर झाडे लावणार आहे.

रस्त्याच्या अभावाने आपल्या कुटुंबातील व्यक्तिला दवाखान्यात नेण्यासाठी विलंब झाल्याने तसा प्रसंग पुन्हा कोणावरही उद्भवू नये यासाठी बिहारच्या दशरथ दास मांझी यांनी 22 वर्ष कठोर मेहनत करुन तिनशे फुटाचा उभा डोंगर फोडून 60 गावांतील शेकडों लोकांना आपल्या घामातून रस्ता तयार करुन दिला आणि ते ‘डोंगर पुरुष’ म्हणून परिचित झाले. 1965 साली ब्रह्मपुत्रेच्या पुराने आपल्या राहत्या बेटासह आसपासच्या बेटांचे वाळवंट झालेले पाहून आसामच्या जोरहाटमधील जादव मोलाई पायेंग यांनी 40 वर्षांच्या मेहनतीने चौदाशे हेक्टरच्या मजुली बेटाला पुन्हा जंगल बनविले व ते ‘वन मानव’ (फॉरेस्ट मॅन) म्हणून ओळखले जावू लागले. तशाच पद्धतीने वृक्षप्रेमातून एकाकी लढा देत बलाढ्य केंद्रीय प्राधिकरणाला गुडघे टेकवायला लावून 27 हजार झाडांना कागदावरुन वास्तवात आणणार्या संगमनेरच्या गणेश बोर्हाडे यांना भविष्यात नक्कीच ‘झाडे वाचवणारा माणूस’ म्हणून ओळखले जाईल. आज या विलक्षण माणसाचा वाढदिवस, त्यांना वटवृक्षाप्रमाणे प्रदीर्घ आणि हिरवेगार आयुष्य लाभावे अशा सदिच्छा.
(माहितीसाठी श्री.गणेश बोर्हाडे 95790 88787)

