ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तिघा विद्यार्थिनींना ‘नृत्य कलाभूषण’ पुरस्कार! नागपूरमध्ये रंगला सोहळा; देशभरातीलदीडशे विद्यार्थ्यांमधून झाली तिघींची निवड


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाद्वारे गुणी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा यंदाचा नृत्य कलाभूषण पुरस्कार ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तिघा विद्यार्थिनींनी पटकावला आहे. नागपूरच्या रेशीम बाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारासाठी देशभरातील दीडशे स्पर्धकांमधून 27 विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यात ध्रुव ग्लोबलच्या तिघींचा समावेश आहे.

भारतातील वेगवेगळ्या नृत्यशैली प्रकारांचा अभ्यास करणार्‍या सुमारे दीडशेहून अधिक स्पर्धकांची या पारितोषिकासाठी निवड झाली होती. त्यातील 27 जणांची अंतिम निवड करण्यात आली व त्यांना ‘नृत्य कलाभूषण’ हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये ध्रुव ग्लोबलच्या सौम्या सचिन जोशी, अदिती राजेश लाहोटी व श्रिया अमोल मुळे या विद्यार्थिनींचा समावेश होता. या शानदार सोहळ्यानंतर तिन्ही विद्यार्थिनींनी पुरस्काराचे श्रेय आपले नृत्य प्रशिक्षक सोनाली महोपात्रा व गंधर्व पलाई यांना दिले, शाळेने नेहमीच आमच्या आवडींना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापनाचे आभारही मानले.

ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शालेय अभ्यासाबरोबरच अभिजात कलांविषयी रुची निर्माण करण्यावर आणि कलांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला जातो. यासाठी ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण देणारे दोन पूर्णवेळ प्रशिक्षक शाळेत उपलब्ध आहेत. ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण घेणार्‍या या तिन्ही विद्यार्थिनींनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पारितोषिके पटकावली आहेत. पुरस्कार सोहळ्याप्रसंगी नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटरचे प्रा. रवींद्र हरदास, आसमान फाउंडेशनचे संस्थापक डॉ. रवी गिरे, भरतनाट्यम गुरू माडखोलकर, प्रा. डिंपल साखरे, प्रा. सुंदरी पिसिपती, अनिल कावडे, ममता जयस्वाल, प्रा. एकता कठोरे, नीलिमा बावणे व निशा श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 144 Today: 2 Total: 1100738

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *