अकोले नगरपंचायतमध्ये कराराचा भंग? दलितमित्र प्रकाश साळवे यांची चौकशीची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले नगरपंचायतमध्ये कराराचा भंग केल्याप्रकरणी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी दलितमित्र प्रकाश साळवे यांनी केली आहे.
याबाबत साळवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोले नगरपंचायतीने 20 नोव्हेंबर, 2018, 30 जून, 2020, व 28 जुलै, 2021 रोजी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नगरपंचायत हद्दीतील दैनंदिन अंदाजे 4 टन कचर्याची विल्हेवाट लावणे, विलगीकरण करणे कामी करार केला होता. या करारात काही अटी-शर्तीबाबत उल्लेख असून यामध्ये सदर ठेकेदाराने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वन विभाग प्रमाणित काम अनुभवाचा दाखला असावा असे असतानाही हा दाखला घेण्यात आलेला नाही.
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सफाई कर्मचार्यांची आरोग्याची दरमहा तपासणी ठेकेदारास करणे बंधनकारक असताना व ते अहवाल नगरपंचायतीला सादर करणे आवश्यक असतानाही त्याची कुठलीही आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच कोरोना महामारीच्या आजारात देखील आरोग्य कर्मचार्यांची तपासणी झालेली नाही. याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन ठेका घेणार्या कंत्राटदाराने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून प्रक्रियेसाठी लागणारी परवानगी घेणे बंधनकारक असताना प्रदूषण मंडळाची परवानगी घेतली नाही. तसेच घनकचरा प्रकल्पासाठी लागणारे मनुष्यबळ त्यांना लागणारी सुरक्षा साधने (गणवेश, सेफ्टी हेल्मेट, ग्लोज, मास्क इ.) साहित्य पुरविणे कंत्राटदारास बंधनकारक असतानाही याची कुठलीही अंमलबजावणी करण्यात येत नाही. किमान वेतन कायद्यान्वये घनकचरा व्यवस्थापन करताना ठेकेदाराने किमान वेतन देणे, भविष्य निर्वाह निधी, सुरक्षा विमा भरण्याची संपूर्ण जबाबदारी असतानाही केली नाही. आजमितीला एकूण 41 कर्मचारी त्याच्याकडे आहे. परंतु ही बाब बंधनकारक असताना पाचच व्यक्तींसाठी त्याने हा लाभ दिला असून, उर्वरीत कर्मचारी यापासून वंचित असल्याचे नमूद केले आहे.
सदर ठेकेदाराने अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून दरमहा केलेल्या कामाच्या तुलनेत जास्तीची बिले काढली आहेत. तरी आपण याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी. या ठेकेदाराने कराराचा भंग केल्याप्रकरणी त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे, त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. तसेच ठेकेदार कराराचा भंग करीत असतानाही त्याची देयके नगरपंचायत प्रशासनाने अदा केली. याबाबतही सखोल चौकशी होऊन संबंधित नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी अनियमितता केली, ठेकेदाराला पाठिशी घातले म्हणून संबंधितांवरही कडक कारवाई करावी, त्यांची वेतनवाढ रोखण्यात यावी, सेवा पुस्तकावरही नोंद करावी, दोषींना निलंबित करावे. अन्यथा आपल्या कार्यालयासमोरआमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा दलितमित्र प्रकाश साळवे यांनी दिला आहे.