पालिकेच्या नगर अभियंत्यासह बांधकाम विभागावर कारवाई करा! चार महिन्यात रस्त्याची वाट लागली; दहा वर्षांपूर्वी दंड झालेल्या ठेकेदाराला पोसण्याचा प्रकार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अंदाधुंद कारभार सुरु असलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातून आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी पालिकेच्या नगर अभियंत्यांनी कर्तव्यात कसूर करीत ज्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायला हवे त्याच्याकडूनच शहरातंर्गत रस्त्यांची कामे करवून घेण्याचा प्रताप केला आहे. विशेष म्हणजे या उद्योगात अवघ्या चार महिन्यांपूर्वी केलेल्या लाखोंच्या रस्त्याची अल्पावधीतच वाट लागली असून सर्वसामान्यांच्या पैशांची अशाप्रकारे उधळण करणार्‍या नगर अभियंत्यासह पालिकेच्या बांधकाम विभागातील सर्व अधिकार्‍यांवर कारवाईसाठी अर्जही दाखल झाला आहे. याप्रकरणी पालिकेने संबंधित ठेकेदाराला यापूर्वीच नोटीस बजावली असून त्याचे देयकंही थांबविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे.

आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासक येण्यापूर्वीच शहरातील सर्व रस्त्यांची कामे सुरु करण्याबाबत कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्या अंतर्गत नवघरगल्ली ते नवीन नगर रोड (लिंकरोड) या रस्त्याचे काम निविदा सूचना काढून संगमनेरातील रस्ते ठेकेदार एस.के.येवले आणि कंपनी यांना देण्यात आले होते. जून्या आणि नवीन शहराला जोडणारा आणि प्रचंड वाहतूक असलेल्या या रस्त्याची तत्पूर्वी अक्षरशः गाळण झालेली असल्याने निविदा निघाल्यानंतर या परिसरात राहणार्‍यांसह या रस्त्याचा दररोज वापर करणार्‍या संगमनेरकरांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र त्यांचे समाधान मोजून चार महिनेही टिकले नाही.

संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम सुरु केले तेव्हा पावसाळा सुरु झालेला होता. रस्त्यांची कामे करताना पाऊस सुरु असल्यास ती करता येत नाहीत. मात्र असे असतानाही संबंधित ठेकेदाराने त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत भरपावसात आपले काम पूर्ण केले. त्याचा परिणाम अवघ्या तीन ते चार महिन्यातच लाखो रुपयांच्या या रस्त्यांची अक्षरशः वाट लागली. जागोजागी खड्डे आणि रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने अल्पावधीतच हा रस्ता पूर्ववत झाल्याने या रस्त्यावरुन दररोज येजा करणार्‍या हजारो संगमनेरकरांनी ठेकेदाराच्या नावाने बोटं मोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालिका प्रशासनानेही त्याची दखल घेत संबंधित ठेकेदाराचे देयकं न देण्याचा निर्णय घेतला.

याबाबत गुरुवारी (ता.15) माहिती अधिकार कार्यकर्ते विजय बेल्हेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे. त्यानुसार अवघ्या चार महिन्यांपूर्वी एस. के. येवले आणि कंपनी या ठेकेदाराने केलेल्या या रस्त्याची अवस्था विशद् करण्यात आली असून सदरचे काम सुरु असताना त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले बांधकाम विभागाचे नगर अभियंता राजेंद्र सुतावणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या रस्त्यासाठी वापरण्यात आलेली खडी व डांबर यासह सर्व साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती होती, तरीही त्यांनी ठेकेदारास पाठिशी घालण्याचे काम केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे एस. के. येवले आणि कंपनी या ठेकेदाराला 20 सप्टेंबर 2012 रोजी डांबराचा वाढीव फरक जादा प्रदान केल्याबाबत ऑडिट रिकव्हरी रक्कम म्हणून 4 लाख 1 हजार 591 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. परंतु बांधकाम विभागातील अधिकार्‍यांशी मिलीभगत करीत त्यांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत सदरची रक्कम जमा केलेली नाही. आजमितीस त्या दंडाची रक्कम व्याजासह 16 लाखांहून अधिक झाल्याचेही बेल्हेकर यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हंटले आहे. सदरील बाब विद्यमान नगर अभियंता राजेंद्र सुतावणे यांना माहिती असतानाही त्यांनी एस. के. येवले आणि कंपनीला पालिका ठेकेदारांच्या काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांच्या नावाने निविदा मंजूर करुन पालिकेच्या व पर्यायाने सामान्य नागरिकांच्या लाखो रुपयांची हानी केल्याचा ठपका ठेवला आहे.

त्यामुळे सदरील रस्त्याच्या कामापोटी देय असलेली रक्कम संबंधित ठेकेदाराला देवू नये व ती त्याच्या दहा वर्षांपूर्वीच्या दंडाच्या रकमेत वर्ग करुन त्याला तत्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच निकृष्ट साहित्य वापरुन पालिका व नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करणारा ठेकेदार, त्याला पाठिशी घालणारे बांधकाम विभागाचे प्रमुख व नगर अभियंता राजेंद्र सुतावणे आणि टेंडर लिपीक व संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या वृत्ताने पालिका वर्तुळासह संगमनेरातही खळबळ उडाली आहे.


सदरील रस्त्याचे काम एस. के. येवले आणि कंपनी यांनी नियमानुसार निवदा सूचनेद्वारा घेतले होते. मात्र कार्यारंभ आदेशानुसार त्यांनी काम सुरु केले तेव्हा पाऊस सुरु झाल्याने प्रशासनाने त्यांना पावसात काम करु नये अशा सूचनाही दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी सदरील रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे नंतर झालेल्या पावसात रस्त्यावरील थर वाहून गेला आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला पालिकेने यापूर्वीच नोटीस बजावली असून पाऊस थांबल्यानंतर सदरील रस्त्याच्या नूतनीकरणासह गटारीच्या वरती आलेल्या चेंबरचेही काम केले जाणार आहे. पालिकेने पावसात रस्त्याचे काम करु नये असे पूर्वीच बजावलेले असल्याने झालेल्या कामापोटी संबंधितास कोणतीही रक्कम अदा करण्यात आलेली नाही.
– राहुल वाघ
मुख्याधिकारी – संगमनेर नगरपरिषद

Visits: 140 Today: 1 Total: 1110888

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *