गोदावरीच्या जीर्ण कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपये मंजूर ः काळे अजूनही 44 कोटी रुपये लवकरच देणार असल्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आश्वासन
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघातील जनतेला गोदावरी कालव्यांची दुरुस्ती करणार असे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी दिले होते. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच दोनच महिन्यांत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्या, अशी मागणी केली होती. याबाबत सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्र्यांनी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 14 कोटी रुपये दिले असून पुन्हा 26 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. अशाप्रकारे 40 कोटी रुपये निधी मिळाला असून अजूनही 44 कोटी रुपये लवकरच देणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह निफाड, शिर्डी, राहाता तालुक्यातील अनेक गावांतील शेकडो हेक्टर शेती व वैजापूर तालुक्यातील काही गावांतील शेती या कालव्यांवर अवलंबून आहे. उजवा कालवा नांदूर-मध्यमेश्वर बंधार्यापासून 110 किलोमीटरपर्यंत व डावा कालवा 90 किलोमीटरपर्यंत वाहत आहे. 100 वर्षे झालेल्या कालव्यांमध्ये झाडे-झुडूपांचे साम्राज्य वाढलेले आहे. या गोदावरी कालव्यांवरील छोटे पूल, एस्केप बंधारे, मोर्यांची बांधकामे मोडकळीस आलेली असून त्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. 677 क्यूसेकने वाहणार्या उजव्या कालव्याला धरणातून 500 क्यूसेक व 379 क्यूसेकने वाहणार्या डाव्या कालव्याला 150 क्यूसेक पाणी जास्त होत असून अनेकदा हे कालवे ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
त्यामुळे त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनावर होत असतो. या गोदावरी कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर सहकारी साखर कारखाने, छोटे-मोठे उद्योग, अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना व निफाड, कोपरगाव, शिर्डी, राहाता या मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन अवलंबून आहे. कालवे जीर्ण झाल्यामुळे कालवे फुटून आवर्तन विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम या शहरातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर होत होता. त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनावर देखील होत होता. ही बाब आमदार आशुतोष काळे यांनी गांभीर्याने घेऊन कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळविण्यासाठी सातत्याने जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला.
त्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळत असून 26 कोटी रुपये गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी दिले आहेत. जीवघेण्या कोरोना संकटात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देताना अडचणी येत असताना देखील निधी मिळाला ही लाभधारक शेतकर्यांच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे. या निधीतून कालव्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार असून अजूनही निधी मिळविण्यासाठी आपले प्रयत्न यापुढेही सुरूच राहणार असून पिण्याचे पाणी, शेती व शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले आहे.