समाज माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा! अमोल खताळ यांची तक्रार; शासनाचाही ‘खोके सरकार’ म्हणून उल्लेख..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर व त्यातच राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल खात्याची जबाबदारी मिळाल्यापासून संगमनेर तालुक्यातील गौण खनिजाचे उत्खनन पूर्णतः बंद आहे. त्यात तालुक्यातील अधिकृत व अनधिकृत अशी एकूण 47 स्टोन क्रशरही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यावरुनच आता समाज माध्यमातून काही जणांनी आपली मानसिक दशा दाखवण्यास सुरुवात केली असून गुरुवारी ‘तुम्ही दिले खोके तर चालतील क्रशर एकदम ओके’ अशा आशयाच्या सोशल माध्यमातील पोस्टवरुन ‘ती’ शेअर करणार्‍या तिघांविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सदरील पोस्ट शेअर करणारे तिघेही एका मोठ्या राजकीय पुढार्‍याचे कार्यकर्ते असल्याचा दावा खताळ यांनी केला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता.15) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अमोल खताळ यांच्या एका मित्राने वरील आशयाच्या सोशल पोस्टद्वारा बदनामी केली जात असल्याची माहिती खताळ यांना दिली. त्या माहितीच्या आधारावर त्यांनी अधिक सखोल चौकशी केली असता त्यांना अशा मजकूरातील पोस्ट ‘त्या’ व्यक्तिशिवाय अन्य दोघांनी इतर दोन समूहात शेअर करुन व त्यात थेट आपल्या नावाचा उल्लेख करीत जाहीर बदनामी केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी त्या पोस्ट शेअर केलेल्या समूहाचे स्क्रिनशॉट काढून थेट पोलीस ठाणे गाठले व झाला प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.

खताळ यांच्यासमोर आलेल्या ‘त्या’ पोस्टमध्ये ‘तुम्ही दिले खोके तर चालतील क्रशर एकदम ओके’ अशा मथळ्याखाली सविस्तर निवेदन करण्यात आले असून त्यात विद्यमान महसूल मंत्र्यांनी आपल्या मर्जीनुसार संगमनेर तालुक्यातील स्टोनक्रशर बंद केल्याचे म्हंटले आहे. स्टोनक्रशर चालकांना कायदे व नियम दाखवले जात असून ‘त्यांच्या’ कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने कोणतीही परवानगी नसतानाही पैशांचे खोके पाठवल्यास साहेबांना सांगून लागलीच क्रशर सुरु करुन देतो अशी कुजबूज सुरु असल्याचे म्हंटले आहे. त्यासाठी निमोण येथील एकासह संगमनेरातील स्वयंघोषित समाजसेवक अमोल खताळ आणि ‘त्या’ नेत्याच्या मर्जीतील माणसे कार्यरत असल्याचाही स्पष्ट उल्लेखही करण्यात आला आहे.

सदरील पोस्ट वाचल्यानंतर खताळ यांनी अधिक चौकशी करता तसाच हुबेहूब मजूकर असलेल्या पोस्ट सोशल माध्यमातील अन्य तीन वेगवेगळ्या समूहातही असल्याचे त्यांना आढळले. त्या शेअर करणार्‍या व्यक्तींचे मोबाईल क्रमांक व त्यांची नावे सोबत घेवून खताळ यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पराग थोरात, बाबासाहेब खेमनर व प्रतीक थोरात या तिघांविरोधात समाज माध्यमात जाणीवपूर्वक बदनामीकारक मजकूर शेअर केल्याप्रकरणी त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम 500 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवरील आरोप सिद्ध झाल्यास या कलमान्वये त्यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा आणि आर्थिक दंडही होवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *