श्रीरामपूर तालुक्यात वादळी वार्यासह गारांचा पाऊस रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान; भरपाईची शेतकर्यांतून मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील गोदावरी नदी पट्ट्यातील अनेक भागात मंगळवारी (ता.28) दुपारी दोन वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह अर्धा तास गारांचा पाऊस पडला. ऐन थंडीच्या मोसमात गारांचा पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या लाल कांद्यासह गहू, हरभरा, मका व ज्वारी सारख्या नगदी पिकांसह भाजीपाला पिकांना काही प्रमाणात फटका बसला आहे.

हवामान बदलामुळे धुके आणि गारांच्या पावसामुळे लागवड योग्य कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी प्रकाश ताके यांनी सांगितले. तालुक्यातील गोदावरी नदी पट्यातील सराला गोवर्धन, माळेवाडी, निमगाव खैरी, हरेगाव, उंदिरगाव, घुमनदेव, माळवाडगाव, मुठेवाडगाव, महांकाळ वाडगाव, खानापूर शिवारात मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

सरासरी अर्धा तास चाललेल्या पावसात हरभर्याच्या आकाराची गारपीट झाली. त्यामुळे उंदिरगाव महसूल मंडलातील अनेक शिवारातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. तर काही भागातील रब्बी हरभरा, ज्वारी व भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांना पुन्हा अस्मानी संकटाचा सामाना करावा लागला. अचानक दुपारच्या सुमारास झालेल्या गारांच्या पावसामुळे शिवारात सुरू असलेल्या कांदा लागवडीसह अन्य शेतीच्या कामे काही वेळ ठप्प झाली होती. तालुक्यात गारपीट झालेल्या भागात तातडीने पंचनामे करुन भरीव नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यातील अनेक शेतकर्यांचे खरीप हंगामातील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा रब्बी हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे नुकसान झाले.
