पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती देणार्‍यांचा लवकरच पर्दाफाश ः वाघ

पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती देणार्‍यांचा लवकरच पर्दाफाश ः वाघ
गाय चोरी प्रकरणाबाबत प्रसिद्धीपत्रकातून स्पष्टीकरण; विरोधकांना दिला इशारा
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील गाय चोरी प्रकरणात कोपरगाव शिवसेना पदाधिकार्‍यांचा हात आहे, असे वातावरण तयार करुन व काही नौटंकी मंडळींच्या सांगण्यावरून वृतापत्रात खोट्या बातम्या प्रसिद्ध करुन शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना खोटा अहवाल पाठवणार्‍यांचा लवकरच पर्दाफाश होणार असल्याची माहिती कोपरगाव शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष सनी वाघ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शिवसेनेत दोन गट असून नेहमीच नौटंकीत अग्रेसर असलेल्या गटाने पक्षाच्या आदेशानुसार काम करणार्‍या दुसर्‍या गटाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. युवासेना अध्यक्षाच्या भावास 20 हजार रुपये किंमतीची जनावरे विकल्याचे भासवून फसवणूक केल्याचा खोटा तक्रारी अर्ज नौटंकी गटाने गाय मालकास हाताशी धरुन कोपरगाव पोलीस ठाण्यास दिला. परंतु कालांतराने असा प्रकार घडलाच नाही व आपण अर्ज देणे चुकीचे असल्याचे गाय मालकाच्या लक्षात आल्यानंतर गाय मालकाने आपली कुठलीही तक्रार नसून आपल्या पहिल्या अर्जाचा विचार करु नये असे लिहून दिल्याने नौटंकी गटाची फजिती झाली आहे.


प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिवसैनिकांची बदनामी करण्याचा डाव फसल्याने नौटंकी गटाने वृत्तपत्रांना व पत्रकारांना खोट्या बातम्या देऊन त्या प्रसिद्ध करून घेतल्या. सदर वृत्तपत्रांना आम्ही वेळोवेळी खुलासा देऊनही प्रसिद्ध केले नसल्याचे सनी वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. या काळात माझ्या घरातील सदस्यांना कोरोना संसर्ग झाल्याने माझ्या व्यस्तपणाचा फायदा फायदा घेऊन त्यांनी हे षडयंत्र रचले आहे. तरी यापुढे कुठलेही षडयंत्र त्यांना रचता येणार नसून लवकरच शिवसेना पक्षप्रमुखांसमोर या प्रकरणाचा पर्दाफाश होणार असून यात प्रामाणिक शिवसैनिकांचा विजय होणार आहे यात शंका नाही. शिवसेना पक्षप्रमुखही आमच्यासारख्या प्रामाणिक शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही असा ठाम विश्वास असल्याचेही वाघ यांनी या पत्रकातून सांगितले आहे.

Visits: 92 Today: 1 Total: 1103173

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *