संगमनेरच्या अमरधाम भ्रष्टाचार प्रकरणी ‘अखेर’ गुन्हा दाखल! श्रीरामपूरच्या मुख्याधिकार्यांची फिर्याद; नगर अभियंत्यासह दोघांवर फसवणुकीचा ठपका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर येथील हिदु स्मशानभूमीचे (अमरधाम) सुशोभिकरणाचे काम झालेले असतांनाही त्याच कामासाठी दुसर्या आणि तिसर्या टप्प्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात आल्या. वास्तविक संगमनेर नगर परिषदेच्या नगर अभियंत्यांनी सदरील निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रत्यक्ष स्थळपाहणीचा अहवाल सादर करणे अभिप्रेत असतांना त्यांनी तसे न करता निविदा काढून एकप्रकारे पालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या बाबत भारतीय जनता पार्टीने आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई पूर्ण झाल्यानंतर आता या प्रकरणात संगमनेर नगरपरिषदेच्या नगर अभियंत्यांसह कनिष्ठ श्रेणीतील अभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताने पालिका वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार 16 नोव्हेंबर 2021 ते 7 मार्च 2022 या कालावधीत घडला आहे. या कालावधीत संगमनेर नगरपरिषदेचे नगर अभियंता राजेंद्र सुतावणे व कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी या दोघांनी संगनमत केले होते. त्यातून त्यांनी संगमनेरच्या हिंदु स्मशानभूमीचे सुशोभिकरण व नुतनीकरणाचे 2019 मध्ये काम झालेले असतांनाही त्याच कामासाठी टप्पा दोन व तीनसाठी सुमारे 33 लाख रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा पुन्हा प्रसिद्ध केल्या. त्यांच्या या कृतीतून त्यांनी पालिकेची फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक भारतीय जनता पार्टीने त्या विरोधात आंदोलन उभे केले.
या आंदोलनादरम्यान विविध नाट्यमय घडामोडीही घडल्या. याच प्रकरणावरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक व शहर भाजपाध्यक्ष यांच्यात कटुताही निर्माण झाली होती. त्यानंतर सदर प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन तसा अहवाल जिल्हाधिकार्यांना सोपविला होता. त्यातून नगर अभियंता राजेंद्र सुतावणे व कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी यांचा हेतू स्पष्टपणे समोर आल्याने गुरुवारी (ता.16) मध्यरात्री श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यावरुन पोलिसांनी वरील दोघाही अधिकार्यांवर संगनमत करुन पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंडसंहितेचे कलम 420, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकार्यांनी अमरधामच्या सुशोभिकरणाचे काम झालेले असतांनाही टप्पा दोन व टप्पा तीनसाठी दोन स्वतंत्र निविदा काढल्या, मात्र त्यासाठी आवश्यक असलेला स्थळपाहणी अहवाल जोडला नाही. त्यामुळे त्यांची ही कृती पालिकेची आर्थिक फसवणूक करणारीच असल्याचा ठपका या फिर्यादीतून ठेवण्यात आला आहे. 162 वर्षांचा इतिहास असलेल्या संगमनेर नगर पालिकेच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच घडलेल्या अशाप्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.