जिल्ह्यात आज सापडले पाच महिन्यातील उच्चांकी रुग्ण! जिल्ह्यातील कोविडची स्थिती गंभीर; सात तालुक्यातील सरासरीने पुन्हा घेतला वेग..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पाच महिन्यांत टप्प्याटप्प्याने कमी झालेल्या जिल्ह्यातील कोविड बाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा वेग घेतला असून आज जिल्ह्याने मागील 148 दिवसांपूर्वीची रुग्णगती प्राप्त केली आहे. आज एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 129 रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी 24 फेब्रुवारीरोजी जिल्ह्यात 143 रुग्ण आढळले होते, त्यानंतर आजच जिल्ह्यातील रुग्णसंख्येने तिहेरी संख्या ओलांडली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झपाट्याने रुग्णवाढ होत असून आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर त्यात आणखी भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज वाढलेल्या तिहेरी संख्येने जिल्ह्यातील सक्रीय बाधितांचा आकडाही साडेपाचशेच्या घरात पोहोचवला आहे.
संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत अनेकांना बाधित करणार्या आणि त्यांचा बळी घेणार्या कोविड संक्रमणाने चालू वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. जानेवारीत तर संक्रमणाने उच्चांक गाठतांना जिल्ह्यातील तब्बल 23 हजार 953 रुग्णांना बाधित केले, तर फेब्रुवारीत त्यात निम्म्याने घट होवून संपूर्ण जिल्ह्यातून 10 हजार 957 बाधित रुग्ण समोर आले. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या घटून मे महिन्यात ती अगदी सरासरी 2.29 रुग्ण प्रतिदिन या गतीने 71 रुग्णांवर आली. त्यामुळे कोविडच्या अनुषंगाने लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील अन्य जिल्ह्यातील संक्रमणाचा वेग खाली असतांनाही अहमदनगर जिल्ह्यातील संक्रमणाची गती मात्र कायम होती. मात्र लागोपाठ दोन वर्ष निर्बंधात राहील्याने नागरीकांच्या सहनशिलतेचा उद्रेक नको म्हणून देशातील दहा संक्रमित जिल्ह्यात समावेश असूनही लसिकरणाच्या आकडेवारीवरुन जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले.
या कालावधीत मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्यांसह विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन झाले, मात्र संक्रमणाची खालावलेली स्थिती कायम राहील्याने सलग दोन वर्ष नागरी मनात दहशत निर्माण करणार्या कोविडबाबत सर्वसामान्यांच्या मनातील भिती नाहीशी झाली. जूनपासून पावसाळा सुरु झाल्याने वातावरणातील बदलांचा परिणामही जाणवू लागला. त्यातच सर्दी, पडसे व खोकल्याची साथ सुरु झाल्याने दवाखाने रुग्णांच्या गर्दीने ओसंडू लागली. याच वातावरणाचा परिणाम गेला.. गेला.. असं समजल्या जाणार्या कोविडसाठीही पोषक असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतराचेही पालन करावे असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून केले गेले. मात्र त्याकडे कोणीही गांभिर्याने पहायला तयार नसल्याने त्याचे दुष्परिणाम आता ठळकपणे समोर येवू लागले असून जूनच्या संपूर्ण महिन्यात जिल्ह्यात आढळलेल्या एकूण रुग्णांच्या जवळपास पाचपटीने रुग्ण जुलैच्या पहिल्या 22 दिवसांतच समोर आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोविड बाधितांच्या संख्येत एकसारखी वाढ होत असून जिल्ह्यात संक्रमणाचा सर्वाधीक वेग अहमदनगर महापालिका क्षेत्रात आहे. येथून दररोज सरासरी 11 पेक्षा अधिक रुग्ण आढळत असून आत्तापर्यंतच्या 22 दिवसांत 246 रुग्ण समोर आले आहेत. त्या खालोखाल श्रीरामपूर तालुक्यातून 100, शेवगाव तालुक्यातून 96, राहाता तालुक्यातून 86, नगर तालुक्यातून 81, संगमनेर तालुक्यातून 77, पाथर्डी व पारनेर तालुक्यातून प्रत्येकी 60, श्रीगोंदा तालुक्यातून 43, राहुरी तालुक्यातून 37, कोपरगाव तालुक्यातून 24, नेवासा तालुक्यातून 15, कर्जत तालुक्यातून 14, अकोले तालुक्यातून 11 व सर्वात कमी जामखेड तालुक्यातून 10 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय नगरच्या भिंगार लष्करी परिसरातून 91, इतर जिल्ह्यातील 42, लष्करी रुग्णालयातील 13 व अन्य राज्यातील पाच रुग्णांचीही त्यात भर पडली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून सर्दी, पडसे, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांची साथही सुर आहे. त्यात कोविड संक्रमणात पुन्हा एकदा वाढ होवू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आगामी कालावधीत कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव व मोहरम या मोठ्या सणांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होवू घातल्याने जिल्ह्यातील कोविडची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्याचा दररोजच्या रुग्णवाढीचा सरासरी वेग 50.5 इतका झाला असून हा वेग मार्चपेक्षाही कितीतरी अधिक आहे.