राष्ट्रवादीच्या फुटीचा संगमनेरला होणार लाभ? विरोधी पक्षनेता पदाची शक्यता; काँग्रेस झाला सर्वात मोठा विरोधी पक्ष..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेनेची शकलं उडून राज्यात घडलेल्या सत्तांतर नाट्याची वर्षपूर्ती साजरी होत असतानाच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. यावेळी महाविकास आघाडीची मोट बांधून भाजपासमोर सक्षम पर्याय उभ्या करणार्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षातच बंडाळी झाली असून राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांसह अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील आमदारांचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना दुसरीकडे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतील फुटीने राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेला काँग्रेस पक्ष आता सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरल्याने यापूर्वी राष्ट्रवादीकडे असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार आहे. या पदासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर असून राष्ट्रवादीच्या फुटीचा लाभ संगमनेरला होणार असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.

राज्याच्या राजकारणाला लागलेल्या फुटीच्या घुशीने केलेल्या करामतीचे प्रत्यंतर रविवारी राष्ट्रवादीतील दिग्गजांसह जवळपास चाळीसहून अधिक आमदारांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या कृतीतून दिसून आले. राज्यासह संपूर्ण देशाच्या विरोधी ऐक्याला धक्का देणार्या या राजकीय भूकंपाचा आगामी कालावधीत होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या ‘मिशन 45’ अंतर्गत राष्ट्रवादीच्या फुटीसाठी राज्यात ऑपरेशन लोटस राबविले गेल्याची चर्चाही आता होवू लागली आहे. आजही संस्थापक अध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या राष्ट्रवादीला स्थापनेपासूनच्या 24 वर्षात पहिल्यांदाच फुटीचा धक्का बसला असून त्यातून पक्षाच्या संस्थापकांसोबत अवघे 10 ते 13 आमदार मागे राहिल्याचेही आता समोर येत आहे.

राज्य विधानसभेत 53 संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळपास चाळीस आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी (ता.2) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. ही घटना राज्यातील राजकारणाला धक्का देणारी ठरली. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गजांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत लेटर हेडवर सरकारला पाठींबा जाहीर केल्याचे जवळपास चाळीस आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना सोपविल्यानंतर तासाभरातच राष्ट्रवादीतील नऊ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली गेली. या समारंभात विधानसभेच्या एकूण 23 आमदारांसह विधान परिषदेतील तिघांची उपस्थिती भुवया उंचावणारी होती. राष्ट्रवादीच्या या निर्णयाला चाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले गेल्याने उर्वरीत अवघे 10 ते 13 विधानसभा सदस्य आणि केवळ तीन विधान परिषदेचे सदस्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहिल्याचेही आता स्पष्ट होवू लागले आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यासोबत आता विधानसभेतील अवघे 13 सदस्य शिल्लक राहिल्याने विरोधी गटात पहिल्या क्रमांकावर असलेला शरद पवारांचा गट आता थेट तिसर्या स्थानावर फेकला गेला असून आघाडीत कालपर्यंत दुसर्यास्थानी असलेला काँग्रेस पक्ष पहिल्या स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे साहजिकच विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद आता 45 आमदारांचे संख्याबळ असलेल्या काँग्रेसकडे जाणार आहे. त्यासाठी रविवारच्या शपथविधीनंतरच चर्चा सुरु झाल्या असून त्यासाठी अडचणीच्या काळात नेतृत्त्व स्वीकारुन पक्षाला सत्तेची खीर चाखवणार्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यासोबतच अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व यशोमती ठाकूर यांच्याही नावाची राज्यात चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील फूट काँग्रेसचे स्थान उंचावणारी ठरणार असून आगामी कालावधीतील निवडणुकांमधील जागांच्या वाटपातही काँग्रेसचे प्राबल्य दिसून आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

प्राप्त माहितीनुसार विधानसभेसोबतच भाजपने विधान परिषदेतील शिवसेनेचा 11 जणांचा गट फोडण्याची योजनाही आखली असून असे घडल्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचेही पद धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. असे घडल्यास विधान परिषदेत नऊ संख्याबळ असलेल्या काँग्रेसला या सभागृहाचेही विरोधी पक्षनेत्याचे पद मिळण्याची शक्यता आहे. या सभागृहात राष्ट्रवादीचेही नऊ सदस्य असून त्यातील सहाजण अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात घडलेला रविवारचा राजकीय भूकंप राज्यातील राजकीय समीकरणं बदलणारा ठरणार असून आगामी कालावधीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येण्याचीही दाट शक्यता आहे.

राज्याच्या राजकारणात रविवारी मोठी उलथापालथ झाल्यानंतर आता काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड करावी लागणार असून त्यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह चर्चेत असलेल्या अशोक चव्हाण, नाना पटोले अथवा यशोमती ठाकूर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांची पक्षनिष्ठा आणि त्यांनी संकटाच्या काळातही पक्षाला दिलेली उभारी पाहता या पदासाठी त्यांचेच नाव निश्चित होण्याची दाट शक्यता आहे.

