पोलिसांचा ‘कस’ काढणारा तपास मात्र आरोपींचे नातेवाईक ‘साशंक’! विदेशी ‘अॅप्लिकेशन’चा वापर; पोलिसांच्या हाती दीडशेहून अधिक जणांची गुपितं..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतवाहिनी महाविद्यालयात संगणक शास्त्राचे शिक्षण घेणार्या अकोल्याच्या संकेत सुरेश नवले याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. सध्या तेे दोघेही पोलीस कोठडीत असून पुढील पाच दिवसांत त्यांच्याकडून काय माहिती मिळते हे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांचा ‘कस’ काढणार्या या प्रकरणाचा उलगडा मोबाईलमधील एका अॅप्लिकेशनमधून झाला असून त्याच आधारे शाहरुख-सलमानची जोडी गजाआड झाली आहे. प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी या दोघांचाही मयताशी बराचवेळ संपर्क झाल्याचे तांत्रिक विश्लेषणातून समोर आल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी अतिशय सामान्य असून आमची मुलं निष्पाप असल्याची भूमिका आरोपींच्या नातेवाईकांनी घेतली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणाच्या तपासातून संगमनेर परिसरातील जवळपास दीडशेहून अधिकजण या ‘अॅप्लिकेशन‘चा नियमित वापर करीत असल्याचेही समोर आले असून त्यात उच्चभ्रू, व्यावसायिक आणि उच्चशिक्षितांची मोठी संख्या आहे.
गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी सुकेवाडी रस्त्यावरील नाटकीनाल्याच्या कडेला संकेत सुरेश नवले या बावीसवर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर सामाजिक व शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळही उडाली होती. सदर विद्यार्थ्याचा मृत्यू नैसर्गिक अथवा अपघाती नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. मात्र संकेत नवले याच्या मारेकर्यांनी खून केल्यानंतर त्याचा मृतदेह नाटकीनाल्याजवळ आणून टाकल्याने पोलिसांना घटनास्थळावरुन काहीच मिळाले नाही. त्यातच मयताचा मोबाईलही मारेकर्यांनी लंपास केल्याने पोलिसांना अंधारात चाचपडण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही. ज्या भागात सदरचा मृतदेह आढळला तो परिसरही निर्मनुष्य असल्याने व त्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेर्यांचाही अभाव असल्याने मयत संकेश नवले सुकेवाडी रस्त्यावर आल्यानंतर पुढे काय घडले याबाबत पोलीस आजही अनभिज्ञच आहेत.
मयत संकेतचा खून का करण्यात आला?, काही नाजूक प्रकरण आहे का?, आर्थिक व्यवहार आहेत का?, पूर्वीचे वाद आहेत का?, महाविद्यालयातंर्गत काही प्रकार आहे का?, मित्रांचा काही सहभाग आहे का? अगदी त्याच्या कुटुंबाचीही काही भूमिका आहे का? या सगळ्या बाजू वारंवार तपासूनही पोलिसांना काही मिळत नसल्याने एकप्रकारे सुरुवातीला पोलिसांचा तपास म्हणजे अंधारातील प्रवासच वाटत होता. त्यातच घटनेला महिना उलटल्यानंतरही तपासाला दिशा नसल्याने संकेत नवलेचे मातृशहर असलेल्या अकोल्यात पोलिसांच्या विरोधात मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो अकोलेकरांनी हातात पेटत्या मशाली घेवून आपला आक्रोश व्यक्त केला. त्यातून पोलिसांच्या तपासाला ‘तज्ज्ञांची’ साथ मिळू लागली आणि नव्या दमाने पुन्हा एकदा कड्या जोडण्यास सुरुवात झाली.
या दरम्यानच्या तपासातून नाशिकमधील एक संशयित समोर आला आणि पोलिसांना हायसे झाले. मयत संकेतशी पूर्वी संपर्कात असलेल्या मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याशी कोणताही संवाद नसलेल्या ‘त्या’ व्यक्तिने पहिल्यांदाच संकेत नवले ज्या मोबाईल ‘अॅप्लिकेशनचा’ वापर करुन संपर्क करीत होता त्याची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीच्या तपासात या अॅप्लिकेशनचा वापर करुन आपल्या आसपास असलेली ‘अपेक्षित’ व्यक्ती कशी संपर्कात येते याचे प्रशिक्षणच ‘त्या’ संशयिताने दिले. त्यामुळे तब्बल महिनाभर अंधारातून चाललेल्या तपासाला दूरवर कोठेतरी प्रकाश दिसू लागला. तपास पथकातील काही कर्मचार्यांनी ‘त्या’ अॅप्लिकेशनची विश्वासार्हता जोखण्यासाठी त्याचा वापरही करुन पाहिला, त्याला मिळालेल्या तत्काळ प्रतिसादामुळे त्यावर पोलिसांचा विश्वास बसल्यानंतर सायबर तज्ज्ञांच्या मदतीने नेमक्या दिशेला तपास सुरु झाला.
त्यातून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करता करता पोलिसांनाही धक्का बसावा अशी एक-एक नावे समोर आली. त्यात विद्यार्थी, उच्चभ्रू घरातील व्यक्ती, उच्चशिक्षित पगारदार नोकर, काही व्यावसायिक अशा जवळपास एकशे साठहून अधिक जणांची नावे समोर आली. त्यातील काहींच्या चौकशीतून या अॅप्लिकेशनचा वापर करुन आपली आर्थिक फसवणूक झाल्याचेही काही प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यासह सदरचे अॅप्लिकेशन तयार करणार्या विदेशी कंपनीशीही पोलिसांनी अधीक्षक पातळीवरुन व न्यायालयाच्या आदेशावरुन पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसला तरीही पोलिसांकडून सदरील कंपनीकडून अपेक्षीत असलेली ‘तांत्रिक’ माहिती मिळवण्यासाठी वरीष्ठ पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत.
नाशिकच्या ‘त्या’ संशयितापासून प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात केल्यानंतर चौकशी पथकातील कर्मचार्यांनी ‘त्या’ अॅप्लिकेशनमधून समोर आलेल्यांचीही एक-एक करुन चौकशी केली. त्यातूनच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करताना घटनेच्या दिवशी मयताने सदर अॅप्लिकेशनचा वापर करुन पाच जणांशी संपर्क केल्याचे व त्यातील दोघांशी त्याचा प्रत्यक्ष संपर्क झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्या पाचही जणांवर सातत्याने नजर ठेवून त्यांची दैनंदिनी जाणून घेतली आणि अॅप्लिकेशनसह अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यातील ‘ते’ दोघे ‘शाहरुख-सलमान’च्या रुपाने बुधवारी गजाआड करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले दोन्ही तरुण 22 व 30 वयाचे असून खाद्यपदार्थाच्या हातगाड्यांवर काम करुन ते आपली उपजीविका सांभाळतात. त्यांची ‘जोडी’ पुनर्वसन कॉलनीच्या परिसरात भलतीच चर्चेत असल्याचेही तपासात आढळले आहे.
मुळात या घटनेचा संपूर्ण तपास मोबाईलवरील विविध अत्याधुनिक अॅप्लिकेशनवर आधारित आहे. संगमनेर शहर अथवा तालुक्यात अशा प्रकारच्या एखाद्या चुकीच्या अॅप्लिकेशनवरुन एखाद्याचा खुनही होवू शकतो? अशी घटना बहुधा पहिल्यांदाच घडल्याने पोलिसांनी आत्तापर्यंत केलेला तपास आणि त्यातून दोघांना झालेली अटक काहींसह आरोपींच्या नातेवाईकांनाही पटलेली नाही. त्यातच एरव्ही कोणत्याही गंभीर प्रकरणाच्या तपासाची माहिती देताना पत्रकार परिषदा घेणार्या पोलिसांनी या प्रकरणात मात्र जुजबी माहिती देवून पत्रकारांची बोळवण केली. त्यातच सामान्यांना तपासाबाबत फारक ाही माहिती नसल्याने समोर आलेल्या वृत्तांमधून ‘संशय’ निर्माण झाला व या प्रकरणात पोलिसांची तपास प्रक्रियाच साशंकतेच्या पिंजर्यात उभी राहिली आहे. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या दोघांच्या चौकशीतून काय समोर येते यावरच आता या प्रकरणाची ‘विश्वासार्हता’ अवलंबून आहे.
अतिशय किचकट आणि धक्कादायक तपास असलेल्या या प्रकरणाच्या मूळाशी असलेले ‘ते’ मोबाईल अॅप्लिकेशन वापरणारे एकट्या संगमनेर शहर व आसपासच्या परिसरात दीडशेहून अधिकजण असल्याचे व त्यात विद्यार्थी, व्यावसायिक, उच्चभ्रू व उच्चशिक्षितांचा अधिक भरणा असल्याचेही समोर आले आहे. यातील अनेकांकडे या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली आहे. यावरुन कमी वयात हातात मोबाईल आल्यानंतर काय घडू शकते यांची दुसरी बाजूही प्रकर्षाने समोर आली असून त्यातून एका अतिशय हुशार विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणातून बोध घेवून आपल्या पाल्यावर अंधविश्वास ठेवणार्या पालकांनी वेळीच जागृत होण्याची आणि चाणाक्षपणे आपल्या पाल्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरजही निर्माण झाली आहे.