पाचशेहून अधिक वर्षांचा इतिहास असलेले संगमनेरचे ग्रामदैवत! सप्तश्रृंगी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले; कोविड नियमांसह मास्कची सक्ती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रागैतिहासापासून ते स्वातंत्र्य समरापर्यंत अनेक घटना आणि घडामोडींचे केंद्र राहिलेले संगमनेर धार्मिकदृष्ट्याही संपन्न आहे. येथील सर्वधर्मियांच्या अनेक प्रार्थनास्थळांना मोठा इतिहासही लाभलेला आहे. ज्या पद्धतीने येथील मंदिरांचे प्राचीनत्त्व आहे, त्याप्रमाणे दर्गे आणि चर्चही आपला इतिहास बाळगून आहेत. सांस्कृतिक परंपरा जोपासणार्या या शहरातील कसबा पेठेत असलेले सप्तश्रृंगी देवीचे मंदिर या कडीत वरच्या स्थानावर आहे. गेली दोन वर्ष कोविडचे संकट शिरावर घेवून उगवलेल्या आश्वीन मासात देवीच्या उत्सवाचा डामडौल नसला तरीही, भाविकांच्या श्रद्धेला त्यामुळे कोठेही ओहोटी लागलेली नाही. संक्रणाची भीती कायम असतानाही राज्य सरकारने याच भावनांचा आदर करुन आजपासून राज्यातील देवांना आपल्या भक्तांच्या भेटीसाठी खुले केले. पाचशेहून अधिक वर्षांचा प्रगल्भ इतिहास लाभलेल्या संगमनेरच्या कसबा पेठेतील संगमनेरच्या ग्रामदैवत असलेल्या सप्तश्रृंगीमाता मंदिराची कवाडेही आजपासून खुली करण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी कोथमिरे मसाला उद्योगाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहसंघचालक सुभाष कोथमिरे आणि त्यांच्या परिवाराच्या हस्ते आरती करण्यात आली.
समुद्रमंथनात निघालेला अमृत कुंभ घेवून देवीदेवता रतनगडावर जमले. यावेळी अमृताचे वितरण होत असताना राऊ नावाच्या असूराने देवतांचे रुप परिधान करुन धोक्याने अमृत मिळविले आणि त्याचे प्राशन करुन अमरत्त्व प्राप्त केले. मात्र हा सर्व प्रकार त्यावेळी आकाशात उगवलेल्या चंद्राने पाहीला आणि त्याने ही गोष्ट नारायणाच्या कानी घातली. त्यांनी सुदर्शन चक्राने त्या असूराचे शिर उडविले ते आजच्या राहुरीला जावून पडले, त्यावरुनच त्या शहराचे नाव ‘राहुरी’ असे पडले. राऊने त्याआधीच अमृत प्राशन केलेले असल्याने तो अमर होता, पुन्हा जिवंत होवू शकला असता. त्यामुळे विष्णुंनी रतनगडावर पडलेल्या राऊच्या देहावरील त्याचा कंठ आपल्या पायाच्या अंगठ्याने दाबला. त्यामुळे काही क्षणांपूर्वी त्याने प्राशन केलेले सगळे अमृत त्याच्या पोटातून बाहेर पडू लागले आणि गडावरुन वाहणार्या नदीत मिसळू लागले. राऊच्या पोटातील अमृत आजच्या प्रवरानदीतून वाहीले, म्हणून ती अमृतवाहिनी झाली. याचा संपूर्ण उल्लेख मत्स्यपुराणात आढळून येतो.
रामराज्यात संगमनेर दंडकारण्यात होते. येथून काही मैलांच्या अंतरावर अकोलेनजीक अमृतवाहिनीच्या तीरावर अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमि आहे. साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांचा पदस्पर्शही या भूमीला झाला आहे. संतकाळात ज्ञानेश्वर माऊलींपासून ते भवानी शंकर बाबांपर्यंत अनेक विभूतींचा संचार संगमनेरच्या परिसरात होता. इतिहासात डोकावले मराठा साम्राज्याची पायाभरणी करणारे शहाजीराजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, खुद्द हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, मुघल सल्तनीतील शहजहान बादशहाची बेगम मुमताज महल आणि तिची दोन मुले दोन वर्षांचा (बादशहा) औरंगजेब आणि दारा शुकोह यांच्यासह येथील गढी किल्ल्यात ओलीस होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे यांचा मोठा सहवास या नगरीला लाभला आहे. ‘बिकट वाट वहिवाट नसावी; धोपट मार्गा सोडू नको..’ असा अजरामर फटका लिहिणारे कवी अनंत फंदी घोलप संगमनेरचेच. निजामशाहीतील साडेतीन शहाण्यांपैकी एक शहाणा म्हणजे संगमनेरचे विठ्ठल परशरामी होते.
स्वातंत्र्यलढ्यातील अनेक चळवळींची सुरुवात संगमनेरात झाली. ब्रिटीश राजवटी विरोधात उभारल्या जाणार्या आंदोलनांची आखणी संगमनेरात झाली. त्यातून येथील घराघरात सत्ताग्रह पोहोचला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विभूतींचे पाय संगमनेरला लागले आहेत. मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळीचा संगमनेरात मोठा प्रभाव दिसून आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील चळवळींचे केंद्रही संगमनेरचं होते. इतका मोठा आणि प्रगल्भ इतिहास लाभलेल्या संगमनेरनगरीतील प्राचीनत्त्वाच्या बहुतांश खुणा दरावस्थेमुळे पुसल्या गेल्या आहेत. ज्या ठिकाणी राबता आहे, श्रद्धा आहे अशी ठिकाणं मात्र भाविकांच्या इच्छाशक्तिने शाबूत आहेत. अशांपैकीच एक म्हणजे संगमनेरच्या कसबापेठेतील सप्तश्रृंगी मातेचे मंदिर. या मंदिराच्या प्राचिनत्त्वाबाबत नेमका दाखला नसला तरीही पाचशे वर्षांपासूनचे दाखले इतिहासात गवसतात.
त्याहीपेक्षा हे मंदिर प्राचिन असेल अशी शक्यताही कायम आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान सप्तश्रृंगी निवासिनीच्या वणीगडाला आहे. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभ-निशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. जगदंबेची या भूतलावर 51 शक्तिपीठे आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरुपिणी धर्मपीठ, ओंकारस्वरुप अधिष्ठान म्हणजे सप्तश्रृंगी माता. सप्तश्रृंगी मातेचे मूळस्थान नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गेडावर असले, तरीही संगमनेरातील या मंदिराचे त्याचे काहीतरी संबंध असण्याची शक्यता असू शकते.
देवी भागवतामध्ये संगमनेरच्या सप्तश्रृंगी माता मंदिराचा 51 वे शक्तिस्थान म्हणून उल्लेख आढळतो. त्यावरुन दैत्यांचा संहार करतांना देवीचा काहीकाळ मुक्काम या ठिकाणी घडला असावा असेही भाविकाच्या मुखातून ऐकायला मिळते. त्यामुळे येथील कसबा पेठेतील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी अगदी ज्ञात असलेल्या इतिहासापासून विभूतींचा ओघ लागल्याचे दिसून येते. दरवर्षी आश्वीन महिन्याच्या प्रारंभापासून दशमीपर्यंत येथे देवीचा उत्सव साजरा होतो. नऊ दिवस देवी घटी बसलेली असते. संगमनेरचे ग्रामदैवत असल्याने नवरात्रातील दहाही दिवस या भागात संगमनेरकरांची मोठी गर्दी दाटलेली असते. यावर्षीही नवरात्रीत मंदिरे उघडतील की नाही अशी साशंकता असतांना राज्यसरकारने भाविकांच्या श्रद्धेचा आदर केल्याने आजपासून राज्यातील मंदिरांची कुलपे उघडण्यात आली आहेत. संगमनेरच्या ग्रामदैवत सप्तश्रृंगी मातेच्या उत्सवाच्या शुभारंभाची आरती कोथमिरे मसाले उद्योगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहसंघचालक सुभाष कोथमिरे, त्यांच्या पत्नी अनुराधा, मुले मोरेश्वर, विवेक, स्मिता आणि समर्थ कोथमिरे यांच्या हस्ते करण्यात आली.
संगमनेरचे ग्रामदैवत सप्तश्रृंगी मातेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत खुले करण्यात आले आहे. मंदिराच्या जिर्णोद्धारातून एकाचवेळी अनेक भाविकाना दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केलेली असल्याने गर्दी न करता प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन घेता येईल असे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार कोविड नियमांचे सक्तिने पालन करण्यात येणार आहे. भाविकांनी कसबा पेठेत येतांना सामाजिक अंतराचे पालन करावे. मास्कशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी कृपया मास्क घालूनच यावे ही विनंती. सध्या देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार आणि सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. या कामासाठी भाविकांनी आपले योगदान अवश्य द्यावे.
अॅड.श्रीकांत गोंगे
अध्यक्ष : श्री सप्तश्रृंगी देवी सार्वजनिक ट्रस्ट