संगमनेर शहरालगतच्या उपनगरांत चोरट्यांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ! पोलिसांचा धाक संपला; बेडरपणे एकामागून एक डझनभर घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजकीय आशीर्वादाने बिनधास्त झालेल्या अधिकार्‍यांच्या भरवशावर अवैध व्यवसायांचे ‘हब’ बनत चाललेल्या संगमनेरातून सर्वसामान्यांची झोप उडवणारी घटना समोर आली आहे. गुरुवारी दिवसाढवळ्या अत्यंत बेडरपणे अज्ञात चोरट्यांनी मालदाडरोड परिसरात अक्षरशः धुमाकूळ घालीत वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यासह त्याच परिसरातील सुमारे डझनभराहून अधिक घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे संगमनेरच्या ‘कर्तव्यदक्ष’ पोलीस अधिकार्‍यांनी यासर्व घटनांमधून केवळ एकाची फिर्याद नोंदवून घेत अन्य घरफोड्यांचा फिर्यादीत केवळ उल्लेख केला आहे. तर, काहींनी तक्रार देण्याचेही टाळले आहे. अतिशय गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या एकामागून एक घटनांनी संगमनेर पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक संपुष्टात आल्याचेही सिद्ध केले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना गुरुवारी (ता.21) सकाळी 9 ते दुपारी दिडच्या सुमारास मालदाड रोड परिसरातील प्रेरणानगरमध्ये घडली. राज्य वीज वितरण कंपनीतील सहाय्यक अभियंता दिग्विजय दिनकर लोहे हे वरील वसाहतीत आपले आई-वडील, पत्नी व मुलासह राहतात. मात्र सध्या त्यांचे कुटुंबिय त्यांच्या मूळगावी गेलेले असल्याने घरात ते एकटेच होते. नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते आपले घर कुलुपबंद करुन पिंपरणे येथील वीज उपकेंद्रात सेवा बजावण्यासाठी रवाना झाले. मात्र या दरम्यान त्यांना आपल्या लॅपटॉपची गरज भासल्याने व तो घरीच राहील्याने दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास तो घेण्यासाठी ते पुन्हा घरी आले. मात्र घरी येताच समोरचे दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला.

त्यांच्या घराला लावलेले कुलूप व कडी-कोयंडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे आपल्या घरात काहीतरी आक्रीत झाल्याचे पाहून ते धावतच घरात गेले असता घरातील कपाट व सामानाची उचकापाचक झाल्याचे त्यांना आढळले. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिनेही गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर झाल्या प्रकाराबाबत त्यांनी आसपासच्या रहिवाश्यांकडे चौकशी केली असता असेच प्रकार एक-दोन नव्हेतर एक डझनाहून अधिक ठिकाणी घडल्याचे त्यांना समजले. एकाचवेळी आणि ते देखील दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनांनी परिसरातील सगळेच रहिवासी चोरट्यांच्या बेडरपणाच्या दहशतीत आले. यानंतर जेव्हा परिसरात घडलेल्या एक-एक घटना समोर येवू लागल्या, तेव्हा मात्र संगमनेरात पोलिसांचा धाक शिल्लक राहीला नसल्याचेच स्पष्ट झाले.

गुरुवारी सकाळी 9 ते दिड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या साखळी घटनांची नोंद मात्र रात्री 9 वाजता करण्यात आली. या दरम्यान नाशिकहून ठसे तज्ज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले, मात्र नेहमीप्रमाणे ती केवळ कवायतच ठरली. घरफोडी करुन घरातील ऐवज चोरी गेलेल्या जवळपास एक डझनहून अधिक नागरिकांमधील निम्म्या जणांनी गुन्हे दाखल करुन काहीच साध्य होणार नाही असे सांगत पोलीस ठाण्यात जाण्याचेच टाळले. त्यामुळे पोलिसांचेही फावले आणि त्यांनी सहाय्यक अभियंता दिग्विजय लोहे यांच्या नावाने अज्ञात चोरट्यांविरोधात भा.दं.वि. कलम 380, 454 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे सोपस्कार पूर्ण केले. लोहे यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातून प्रत्येकी एक तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, अर्धा तोळ्याची कर्णफुले व लहान बाळाच्या हातातील चांदीचे सहा कडे, सहा नगर कंबरेच्या साखळ्या व दोन ग्लास असा पोलिसांच्या हिशोबाने अवघा 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. या फिर्यादीत चोरीला गेलेल्या सोन्याची प्रतितोळा किंमत 15 हजार रुपये दाखविण्यात आली आहे. पोलिसांकडून माध्यमांना केवळ हा एकमेव प्रकार कळविण्यात आला हे विशेष. यावरुन पोलीस आपली निष्क्रीयता लपविण्याचा केविलवाणा प्रयोग करीत असल्याचे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञांची गरज पडणार नाही.

अभियंता लोहे यांच्यासोबतच अन्य पाच जणांनीही घरफोडीची तक्रार घेवून पोलीस ठाणे गाठले होते. मात्र ऐवज चोरीला जावूनही त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्याचा कार्यक्रम शहर पोलिसांत घडला. साखळी पद्धतीने एकामागून एक घडलेल्या चोरीच्या या घटनांमध्ये मालदाड रोडवरील समर्थ हाइटसमध्ये राहणारे भाऊसाहेब शेटे, स्वामी समर्थ वसाहतीमधील विजयाश्री अर्जुन अवटी, साईबन वसाहतीत राहणार्‍या सुजाता नामदेव खटाटे, मालपाणी हॉस्पिटलजवळील उत्सव इमारतीत राहणारे शरद त्र्यंबक घोलप व विशाल अरुणप्रसाद वाजपेयी अशा पाच जणांच्या घराचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व अगदी बेडरपणे मुद्देमाल चोरुन नेला. विशेष म्हणजे या पाचही जणांच्या चोरीचा उल्लेख अभियंता लोहे यांच्याच फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यावरुन पोलीस आपली निष्क्रीयता लपविण्याचा सगळ्यात स्वस्त प्रयोग राबवित असल्याचे उघड झाले.

गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर बदलून येणारा अधिकारी राजकीय आशीर्वाद मिळवून संगमनेरात स्थिरस्थावर होतो. सध्या पोलीस दलाची अवस्थाही अशीच आहे. वारंवार गंभीर आरोप होवूनही आणि वेगवेगळ्या घटनांनी संगमनेरची इंभ्रत संपूर्ण राज्यात जावूनही येथील काही अधिकार्‍यांवरील राजकीय छत्र बाजूला हटण्याचे नाव घेत नसल्याने संगमनेरची कायदा व सुव्यवस्था कधीनव्हे इतकी ढासळली आहे. कधीकाळी सुसंस्कृत असल्याचा ढोल वाजवला जाणारे संगमनेर शहर आजच्या स्थितीत काही निष्क्रीय अधिकार्‍यांमुळे गुन्हेगार आणि गुन्हेगारी घटनांचे केंद्र ठरु लागल्याने संगमनेर आता अवैध धंद्यांचे ‘हब’ बनू लागले आहे. अधिकारी येतील आणि जातील पण संगमनेरकर शेवटपर्यंत येथेच राहणार आहेत आणि त्यांच्याच जीवावर आपण वेगवेगळ्या राजकीय भूमिका साकारणार आहोत याचे स्मरण संगमनेरातील राजकीय धुरीणांनी सतत ठेवण्याची गरजही यातून निर्माण झाली आहे.

संगमनेर पोलिसांचा गुन्हेगारांवर धाकच नसल्याचे सिद्ध करणार्‍या साखळी पद्धतीच्या या चोर्‍यांनी पोलिसांच्या निष्क्रीयतेचे वाभाडेही काढले आहेत. दैनिक नायकला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दिवसाढवळ्या जाणताराजा मैदानापासून ते मालदाड रोडपर्यंतच्या लांबलचक परिसरात एक-दोन नव्हेतर तर तब्बल एक डझन घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे या परिसरात अशाच प्रकारच्या आणखी दहा घटना घडल्याचीही जोरदार चर्चा कानावर आली, मात्र त्या चर्चेला हात-पाय नसल्याने त्याबाबत वरील वृत्तात उल्लेख करण्यात आलेला नाही. संगमनेर शहराला चोर्‍या, घरफोड्या, सोनसाखळी अथवा रोकड लांबविण्याचे प्रकार नवे नाहीत, मात्र शहराच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच दिवसाढवळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या होण्याचा प्रकार घडला आहे हे मात्र निश्चित.

Visits: 99 Today: 1 Total: 1106100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *