संघटीत गुन्हेगारीच्या पहिल्याच प्रकरणातील चौघांची निर्दोष मुक्तता! संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा; घारगाव पोलिसांनी केली होती कारवाई..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित घडलेल्या जबरी चोरीच्या प्रकरणातील चौघांनी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात संघटीतपणे अनेक गुन्हे केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांनी पूर्ण करुन संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी अतिरीक्त जिल्हा न्यायाधिश दिलीप घुमरे यांच्यासमोर होवून चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील सूत्रधाराने आपल्या साथीदारांसह शस्त्रांचा धाक दाखवित चक्क काकाच्या घरातच जबरी चोरी केली होती.
याबाबतची हकिकत अशी की, आठ वर्षांपूर्वी 25 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पठारभागातील मुंजेवाडी (अकलापूर) येथील भाऊसाहेब भिमाजी जाधव यांच्या घरात चौघे सशस्त्र चोरटे शिरले व त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवित घरात ठेवलेल्या दोन पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवलेली दहा हजारांची रोकड व जमीनीचे कागदपत्र पळवून नेले होते. यावेळी फिर्यादीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांच्यावर कोयत्याचा वार करुन त्यांना जखमी केले. या प्रकरणी दाखल तक्रारीवरुन घारगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी चौघांविरोधात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. धक्कादायक म्हणजे या प्रकरणाच्या तपासात जाधव यांच्या घरात चोरी करणार्यांमध्ये त्यांचा सख्खा पुतण्या असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढीत संतोष शिवाजी जाधव (वय 26, रा.आभाळवाडी, ता.संगमनेर), संदेश दत्तू धांडे (वय 30, रा.कोंडेगव्हाण, ता.श्रीगोंदा), चंदर दादाभाऊ गाडे (वय 29, रा.जवळा, ता.पारनेर) व शरद बन्सी निचीत (वय 21, रा.वडनेर खुर्द, ता.शिरुर) या चौघांनाही 2 जानेवारी 2018 रोजी अटक केली.
न्यायालयाने त्या सर्वांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर घारगाव पोलिसांच्या तपासात या टोळीने आपले वर्चस्व निर्माण करताना अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगावसह आश्वी, पारनेर व पुणे जिल्ह्यातील शिरुर, आळेफाटा व नारायणगाव पोलिसांच्या हद्दित जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न व चोरी या सारखे एकूण 11 गुन्हे संघटीतपणे केल्याचे समोर आले. त्यांच्या गुन्ह्यांची माहिती संकलीत करीत असताना टोळीप्रमुख संतोष जाधव याने आपल्या साथीदारांसह टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी मालाविरुद्ध गुन्हे करताना त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये वेळोवेळी कारवाई होवूनही त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने संगमनेरचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांनी या चौघांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाच्या (मकोका) कलम 3 (1) (॥), 3 (4) प्रमाणे कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाला 2 मार्च 2018 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर टोळीप्रमुख संतोष शिवाजी जाधव, याच्यासह टोळी सदस्य संदेश दत्तू धांडे, चंदर दादाभाऊ गाडे व शरद बन्सी निचीत या चौघांवर वाढीव कलमांन्वये गुन्हा दाखल करुन त्यांची कोठडी घेण्यात आली व त्यांच्या विविध कारणाम्यांचा सखोल तपास करुन त्याबाबतचे दोषारोपपत्र संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर जिल्हा न्यायाधिश दिलीप घुमरे यांच्यासमोर सविस्तर सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने 20 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र आरोपीच्यावतीने कामकाज पाहणार्या विधिज्ञ अतुल आंधळे व सीमा काळे यांनी जोरदार युक्तिवाद करीत विविध दाखल्यांसह मकोका कायद्यातील तरतूदींवर आक्षेप नोंदवला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी (ता.27) या प्रकरणातील चारही आरोपींची मकोका कायद्यातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
संगमनेर तालुक्यात एकूण चार पोलीस ठाणी असून तालुक्याच्या इतिहासात घारगाव पोलिसांकडून संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा होता. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. या खटल्यात आरोपींच्या वतीने कामकाज पाहणार्या विधिज्ञांना मोहन फटांगरे, ऋषिकेश होले व अमृता गुंजाळ यांनी साहाय्य केले.
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित चौघा चोरट्यांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केल्यानंतर या टोळीने संघटीतपणे अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दित 11 गुन्हे केल्याचे समोर आले होते. त्यावरुन या चौघांवरही संगमनेर तालुक्याच्या गुन्हेगारी इतिहासात पहिल्यांदाच संघटीत गुन्हेगारी कायद्यातील तरतूदींचा वापर केला गेला होता. मात्र या पहिल्याच प्रकरणातून चौघाही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. सध्या घारगाव पोलिसांकडून साकूर येथे घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणातील नऊजणांच्या टोळीविरोधातही याच कायद्यान्वये तपास सुरु असून लवकरच त्याचेही दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे.