… अखेर कैलास वाकचौरे भाजपमधून स्वगृही परतले! मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश

नायक वृत्तसेवा, अकोले
माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांचे खंदे समर्थक असलेले जिल्हा परिषदेतील अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे यांनी मंगळवारी (ता.21) अधिकृतरित्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश केला. यामुळे ऐन अगस्ति साखर कारखाना निवडणुकीच्या रणधुमाळीत वाकचौरे स्वगृही आल्याने पिचडांना मोठा धक्का मानला जात आहे.

पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये आले. मात्र, अनेकांना भाजप रुचले नसल्याने भाजपला सोडचिठ्ठी दिली. विधानसभेत भाजपला अपयश आल्याने नगरपंचायत निवडणुकीत मात्र सर्व ताकद पणाला लावून सत्ता काबीज केली. मात्र थोड्याच दिवसांत नगरपंचायतची निवडणूक झाल्यावर भाजप पक्षांतर्गत नाराजी व मानसन्मानावरुन कलह सुरू झालाचे पाहायला मिळत आहे. सध्या अगस्ति साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू असतानाच कैलास वाकचौरेंच्या रुपाने पिचडांना पहिला धक्का बसला आहे. येत्या काळातही अनेकांचा प्रवेश होणार असल्याच्या चर्चाही यानिमित्ताने अकोले तालुक्यात सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, कैलास वाकचौरे यांच्या स्वगृही प्रवेशाच्या चर्चा काही दिवसांपूर्वी चालू होत्या. अखेर यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. औपचारिकता म्हणून वाकचौरे यांचा प्रवेशाचा कार्यक्रम आज पार पडला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. किरण लहामटे, घनश्याम शेलार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक जिल्हाध्यक्ष कपील पवार, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर, प्रकाश नाईकवाडी आदी उपस्थित होते.

Visits: 11 Today: 1 Total: 118733

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *