सूरतेच्या स्वारीत संगमनेरच्या ‘युवा नेत्याची’ गुप्तहेरी! चार दिवसांपूर्वी ट्रायडंट मुक्कामी तर सोमवारी गाठले थेट सूरतचे ली-मेरिडियन हॉटेल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधान परिषदेची निवडणूक सुरू असतानाच महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीची समीकरणं जुळविली गेली होती, त्याचे दृष्यचित्र या निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी समोर आले असले तरीही त्याच्या हालचाली मात्र चार दिवसांपूर्वीच सुरु झाल्या होत्या हे आता समोर येवू लागले आहे. यासर्व घडामोडींमागे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचीं राजकीय खेळी मानली जात आहे. मात्र त्याचवेळी या संपूर्ण घटनाक्रमामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांवर ‘नजर’ ठेवण्याबरोबरच सुरतमध्ये पोहोचलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंसह जवळपास डझनभर आमदारांना ऐच्छिकस्थळी पोहोचवण्यात संगमनेरातील एका युवानेत्याची साथ कामी आल्याची माहिती दैनिक नायकच्या हाती लागली आहे. त्यामुळे सूरतच्या स्वारीत संगमनेरचा सहभाग महत्त्वाचा ठरल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

सोमवारी (ता.10) राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या चार उमेदवारांसह शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन व काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सहज विजयी होतील असा अंदाज होता. दहाव्या जागेसाठी भाजपाने प्रसाद लाड यांच्या रुपाने अतिरिक्त उमेदवार उभा केल्याने या जागेसाठी काँग्रेसच्या भाई जगताप यांना त्यांच्याशी संघर्ष करावा लागेल असे मानले गेले होते. प्रत्यक्षात मात्र भाजपाने महाविकास आघाडीची तब्बल 20 मते फोडण्यात यश मिळविल्याने विधान परिषदेच्या दहाव्या जागेचा सामना भाजप विरुद्ध काँग्रेस असा न होता काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा होवून पहिल्या पसंदीची अधिक मते मिळवूनही चंद्रकांत हंडोरे यांना आपल्याच पक्षाच्या भाई जगताप यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. येथूनच आघाडीतील बेबनाव उघड झाल्याने सोमवारी निकाल हाती येतायेता राज्यातील सरकार अस्थिर होईल का अशा शंका वर्तविल्या जावू लागल्या.

त्यातच आज भल्या पहाटेच शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मंत्रीमंडळातील अन्य चार मंत्र्यांसह तब्बल 35 आमदार सोबत घेवून ‘नॉट रिचेबल’ असल्याचे वृत्त धडकले आणि संपूर्ण राज्यात राजकीय भूकंपाचे धक्के जाणवू लागले. जसजशी सकाळ होत गेली, तसतशी या घटनाक्रमाची एकएक कडी उलगडू लागली आणि महाविकास आघाडीच्या सूत्राला मनात उतरविण्यात अपयशी ठरलेल्या शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह असंख्य आमदारांनी बंडखोरीचा झेंडा फडकाविल्याचे स्पष्ट झाले. या सगळ्या घडामोडी एका दिवसांत घडला असे अजिबातच नाही. मात्र राजकारणात जोपर्यंत दृष्य परिणाम समोर येत नाहीत तोपर्यंत अशा गोष्टींकडे केवळ राजकीय भाकीतं म्हणून पाहिलं जातं. मात्र वारंवार प्रयत्न केल्यानंतरही गेल्या तीन वर्षात सरकार अस्थिर करण्यात अपयश आल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळाचा नवा अध्याय लिहीला आणि त्यासाठी अनेक अपरिचित वा फारशा प्रभावात नसलेल्या शिलेदारांचा वापर केल्याचे आता हळुहळु समोर येवू लागले आहे.

अशाच शिलेदारांमध्ये संगमनेरमधील भाजपच्या एका युवानेत्याचा त्यांनी पुरेपूर वापर केल्याची विश्वसनीय माहिती दैनिक नायकच्या हाती लागली आहे. त्यानुसार राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी काँगे्रस व राष्ट्रवादीच्या आमदारांची मुक्कामाची व्यवस्था मुंबईतील ज्या ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली होती, त्याच हॉटेलमध्ये तीन दिवसांपूर्वीच संगमनेरच्या या युवानेत्याला अज्ञात नावाने खोली घेवून राहण्यासाठी पाठविण्यात आले होते. जोपर्यंत या दोन्ही पक्षांच्या आमदारांचा मुक्काम या हॉटेलमध्ये होता तो पर्यंत हा युवानेता तेथेच खोली घेवून मुक्कामी होता. विशेष म्हणजे हा युवानेता महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे विजयी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या विश्वासातील आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात जावून सोमवारी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते आपल्या जवळपास डझनभर समर्थक आमदारांसह ‘विशेष’ विमानाने मुंबईतून थेट गुजरातमधील सुरतच्या ली-मेरिडियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचले, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा सगळ्याच भागातील शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास 35 आमदारांचे मोबाईल आज सकाळपासूनच अचानक ‘नॉट रिचेबल’ झालेत. संगमनेरातून आधी मुंबईतील ट्रायडंटमध्ये मुक्कामी असलेल्या या युवानेत्याला मुंबईनंतर सुरतची स्वारी यशस्वी करण्यासाठी तेथील ‘गुप्तहेरी’ सोपविण्यात आली आणि तोही सोमवारी मध्यरात्रीच सूरतमधील ‘त्या’ हॉटेलमध्ये पोहोचला.

याबाबत दैनिक नायकला विश्वसनीय सूत्रांकडून पक्की माहिती मिळाल्यानंतर भल्या सकाळी त्या युवानेत्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समोर आले, मात्र हा संदेश गुजराती आणि नंतर इंग्रजीत कानी येवू लागल्याने तो सकाळपर्यंत गुजरातध्येच असल्याचे स्पष्ट झाले, मात्र सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ‘नेमकी’ माहिती संकलित करुन त्याने मुंबईच्या दिशेने प्रस्थान केल्याचेही समोर आले आहे. एकूणच या सर्व घडामोडींवरुन महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीत संगमनेरच्या ‘त्या’ युवानेत्याची निर्णायक भूमिकाही समोर आली असून राज्यासह सूरत स्वारीसाठीही त्याने गुप्तहेरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Visits: 7 Today: 1 Total: 29576

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *