रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी बचावला 

नायक वृत्तसेवा, झरेकाठी
एकीकडे तालुक्यात बिबट्यांची दहशत कायम असतानाच आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अनेक गावात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतीचे वाटोळे सुरू केले आहे. त्यातच चारा काढणाऱ्या एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने रानडुकराच्या या हल्ल्यातून शेतकरी बचावल्याची घटना संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे घडली. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. 
संगमनेर तालुक्यातील झरेकाठी शिवारात बाळासाहेब भागवत डोळे यांची गट नंबर १९/३ येथे शेती आहे. बाळासाहेब डोळे हे आपल्या शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत डोळे यांनी तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. रानडुकरांच्या बिनधास्त वावराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आधीच बिबट्याच्या संचाराने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असताना आता रानडकरांची नवीन भर पडल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. ही रान डुकरे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. मका पिकांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मक्याची कणसे ओरबाडून खातांना मकाच्या शेतात खळे निर्माण करत आहेत. त्यामुळे या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली असून तसे निवेदन ते वनविभागाला देणार आहेत.
Visits: 61 Today: 2 Total: 1110179

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *