संगमनेरात साजरा झाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सप्ताह! महसूल विभागाचा स्त्युत्य उपक्रम; तालुक्यातील शासकीय कर्मचार्‍यांचा सहभाग


नायक वृत्तसेवा, संगमनेर
यावर्षी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. संगमनेरच्या महसूल विभागानेही स्वातंत्र्याची पंच्च्याहत्तरी ओलांडणार्‍या आपल्या देशाच्या सन्मानार्थ क्रांती दिनापासून विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात जनजागृतीपासून मैदानी खेळापर्यंतच्या स्पर्धाही घेण्यात आल्या. संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांच्या प्रयत्नातून सहा दिवस चाललेल्या या स्वातंत्र्य सप्ताहात तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनीही अतिशय उत्साहाने सहभाग नोंदविला.

देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यौत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा व्हावा, देशातील नागरिकांच्या मनामनात राष्ट्रभावना प्रज्ज्वलित व्हावी यासाठी केंद्र सरकारने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने संगमनेरच्या महसूल विभागाने 9 ऑगस्टच्या क्रांती दिनापासूनच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा सप्ताह आयोजित केला होता. या सप्ताहाची सुरुवात प्रा. नीलेश पर्बत यांच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : माझी जबाबदारी’ या विषयावरील व्याख्यानाने झाली. तालुक्यातील विविध ठिकाणच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये झालेल्या त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी लाखो क्रांतीकारकांच्या बलिदानावर मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले.

शासनाने यावर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचीही घोषणा केली होती. त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महसूल विभागाने जनजागृतीचा उपक्रम हाती घेवून तालुक्यातील अधिकाधिक घरांवर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकावला जाईल यासाठी योग्य नियोजन करुन अल्पदरात ध्वज उपलब्ध करुन दिले. तालुक्यातील अनेक मोठ्या आस्थापना व सामाजिक संस्थांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात आल्याने या कालावधीत तालुक्यातील एक लाख 4 हजार 800 घरांवर राष्ट्रध्वज फडकाविला गेला. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यौत्सव साजरा करताना राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी सोशल माध्यमाचा प्रभावी वापर करीत विभागाने काय करावे व काय करु नये याबाबतही मोठ्या प्रमाणात प्रबोधन केले.

या दरम्यान तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस यांचा समावेश असलेली तिरंगा प्रभातफेरी व महिला अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा सहभाग असलेली मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. या दोन्ही उपक्रमांनी संगमनेरातील वातावरण देशभक्तीमय झाले होते. 14 ऑगस्टरोजी संगमनेर – सिन्नर – संगमनेर अशी 75 किलोमीटर लांबीची सायकल रॅलीही आयोजित केली गेली. यात मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. त्या सर्वांना पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला फाळणीच्या काळ्या आठवणींना उजाळाही देण्यात आला. त्यासाठी छायाचित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे यांच्या हस्ते करण्यात आला.

एरव्ही कार्यालयीन कामकाजात व्यस्त राहणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये संघ भावना रुजावी यासाठी या सप्ताहात सांघिक स्पर्धाही घेण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने झालेल्या क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे संघ सहभागी करुन घेण्यात आले. पालिकेच्या क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये विविध शासकीय विभागांचे एकूण 16 संघ सहभागी झाले होते. सर्व संघांना केशरी, हिरवी व पांढरी जर्शी (खेळाचा पोषाख) परिधान करुनच मैदानात उतरण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे हिरव्यागार हिरवळीच्या मैदनावरील या स्पर्धांना राष्ट्रीय स्पर्धांचे स्वरुप प्राप्त झाले होते.

या स्पर्धेचा अंतिम सामना जलसंपदा व ग्रामविकास या दोन विभागांमध्ये रंगला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा वाढवणार्‍या हा सामना बरोबरीत संपल्याने पंचांनी सुपर ओव्हरद्वारे त्याचा निकाल लावण्याचे ठरविले. मात्र हे षटकही अतिशय रंगतदार ठरले, अगदी शेवटच्या चेंडूवर जलसंपदा विभागाला आवश्यक असलेल्या तीन धावा मिळतील की पुन्हा सामना बरोबरीत संपेल असे चित्र दिसत असताना जलसंपदा विभागाने पळून तीन धावा मिळवित विजय संपादित केला. स्वातंत्र्य समारोहाच्या मुख्यदिनी पालिकेच्या क्रीडा संकुलात प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करुन लहान मुलांच्या हाताने तिरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. यासोबतच क्रांती दिन ते स्वातंत्र्यदिनाची उत्तरसंध्या या कालावधीत संगमनेर शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय इमारतींवर आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास आठवडाभर संगमनेरच्या प्रत्येक रस्त्यावरुन देशभक्तिचा प्रवाह ओतप्रोत वाहत असल्याचा मनोहारी अनुभव या कालावधीत संगमनेरकरांनी घेतला.

Visits: 101 Today: 1 Total: 1098143

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *