पहिल्याच पावसात पुलावरील रस्ता गेला वाहून तीन दिवसांपूर्वी झाले होते उद्घाटन; शेतकर्यांत नाराजी
नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील कांबीपासून दीड किलोमीटर अंतरावर कांबी-बोधेगाव रस्त्यावरील ओढ्यावर सिमेंट नळ्या टाकून तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात पुलावरील रस्ता वाहून गेला आहे.
कांबी परिसरातील शेतकर्यांना पावसापाण्यात खताचे व्यवस्थापन तसेच शेतमाल बाहेर काढता यावा, यासाठी कांबीलगत असलेल्या ओढ्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून पुलाची मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषद सदस्या संगीता दुसंगे यांनी 15 व्या वित्त आयोगातून दोन पुलाकरीता पाच लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातील दोन नळ्यांचा बनविण्यात आलेल्या ओढ्यावरील पुलाचा डांबरी रस्ता आणि भराव उद्घाटनाच्या तिसर्याच दिवशी कांबी हातगाव शिवारात पडलेल्या पावसाच्या पहिल्याच पाण्याने वाहून गेला. दरम्यान रस्ता खचल्याने वाहतूक बंद असून सदरील रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
या ओढ्यात पावसाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सिमेंटच्या छोट्या नळ्या टाकून उपयोग होणार नाही. हे वारंवार सांगून देखील ठेकेदाराने दखल न घेतल्याने नव्या पुलाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
– बाळासाहेब खरात, शेतकरी
ठेकेदाराला सद्यस्थितीला ओढ्यावरील वाहून गेलेल्या रस्त्यावर मुरूम आणि येत्या चार ते पाच दिवसांत पुलाच्या बाजूने सिमेंट काँक्रिटची भिंत बांधून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
– कैलास शिदोरे (अभियंता-पंचायत समिती, शेवगाव)