शिवसेनेच्या पारंपरिक शिवजयंती मिरवणुकीवर तिघांचा दावा! पोलिसांकडून निर्णय नाही; नैसर्गिक न्यायाने शिंदे गटाला परवानगीची शक्यता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येत्या गुरुवारी तीथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी होणार आहे. दोन दशकांपूर्वी राज्यात तीथीनुसार की तारखेनुसार यावरुन वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून दरवर्षी राज्यात तारखेनुसार आणि तीथीनुसार दोनवेळा शिवजयंती उत्सव साजरा होतो. गेल्या दीड वर्षात राज्यातील विविध राजकीय घडामोडींमुळे मात्र यंदाचा हा उत्सवही संभ्रमात सापडला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संगमनेरातील शिवसेनेच्या दोन्ही गटांसह एका खासगी मित्र मंडळानेही तीथीनुसारच्या शिवजयंतीवर दावा ठोकला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला असून अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या चार दशकांपासून तीथीनुसार होणार्‍या शिवजयंती उत्सवाची मुख्य मिरवणूक शहर शिवसेनेकडून काढली जाते. सद्यस्थितीत हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याने यंदाच्या शिवजयंती उत्सव मिरवणुकीची परवानगीही त्यांच्याच शिवसेनेला मिळण्याची दाट शक्यता आहे.


सन 1990 च्या दशकांत संगमनेरात शिवसेनेची पाळेमूळे रुजवण्यास सुरुवात झाली. राजेंद्र जोर्वेकर यांनी मुंबई आणि उपनगरात पसरलेला हिंदुत्त्वाचा हा विचार संगमनेरात आणला आणि त्याचा प्रचार-प्रसार केला. त्यानंतरच्या कालावधीत रावसाहेब गुंजाळ, आप्पा केसेकर, जयवंत पवार यांच्यासारख्या तत्कालीन शिवसैनिकांनी गावखेड्यापर्यंत हिंदुत्त्वाचा विचार पेरुन संघटनात्मक बांधणी केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या नावातून प्रेरणा घेवून या संघटनेची स्थापना केल्याने अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी त्यावेळी सर्वत्र तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या या उत्सवावर आपल्या पक्षाचे वर्चस्व स्थापित केले.


त्याच अनुषंगाने सन 1985 पासून संगमनेरातही तीथीनुसार शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली. उत्सवाच्या दिवशी सायंकाळी संगमनेर नगरपरिषदेपासून शिवजयंतीच्या निमित्ताने वाजतगाजत मिरवणूकही काढण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत तीथीनुसार निघणारी शिवजयंतीची मिरवणूक शिवसेनेचीच मानली जाते. संगमनेरात 1985 पासून आजवर शिवजयंतीची मिरवणूक शिवसेना संगमनेर शहर या झेंड्याखालीच काढण्यात आली आहे व त्याची परवानगीही त्या-त्या वेळच्या शहरप्रमुखांनी शिवसेनेच्या ‘अधिकृत’ पत्राद्वारेच मिळवली आहे. मात्र 2012 नंतरच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेनेच्या या उत्सवाची परवानगी मागताना खासगी मंडळाचे लेटरहेड वापरण्यास सुरुवात केल्याने या कालावधीतील परवानग्या ‘त्या’ मंडळाच्या नावावर दिसत असल्या तरीही त्यात शिवसेनेची पारंपरिक हा उल्लेख मात्र कायम आहे. त्यावरुन संगमनेरातील शिवजयंती (तीथीनुसार) उत्सवाच्या दिनी निघणारी मिरवणूक शिवसेनेचीच असल्याचेही स्पष्ट होते.


यावर्षी गुरुवारी (28 मार्च) महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची 394 वी जयंती साजरी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. संगमनेरातील शिवजयंती उत्सव समितीनेही परंपरेनुसार मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. तर, शिवसेनेच्या वतीने (शिंदे व उबाठा गट) 28 मार्चरोजी पारंपरिक पद्धतीने शिवसेनेची मिरवणूक काढण्याची परवानगी मागितली आहे. त्यांच्या अर्जासोबतच आता त्यात एका खासगी मित्र मंडळानेही या मिरवणुकीवर दावा करीत परवानगी मागितल्याने पोलीस प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.


त्यातून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी अभिलेखागारातून शिवजयंती उत्सवाचा इतिहास उकरण्यास सुरुवात केली असून ज्यांनी या उत्सवाच्या निमित्ताने मिरवणूक काढण्याची पद्धत सुरु केली, त्यांनाच यावर्षी परवानगी देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना फुटून त्याचे दोन तुकडे झाले आहेत. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा मूळ पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने शिंदेगटाच्या शिवसेनेकडून प्राप्त झालेल्या अर्जालाच शिवजयंती मिरवणुकीसाठी मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे.


संगमनेर शहरात 1985 पासून शिवजयंतीच्या दिवशी (तीथीनुसार) स्थानिक शिवसेनेच्या वतीने पालिकेच्या प्रांगणातून मुख्य मिरवणूक काढली जाते. गेल्या कालावधीतील राजकीय घडामोडींमुळे आज शिवसेनेचे दोनगट निर्माण झाल्याने शिवसेनेची पारंपरिक मिरवणूक कोणाची? अशी शंकाही निर्माण झाली. मात्र सध्याची शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताब्यात असल्याने नैसर्गिक तत्त्वाने संगमनेरच्या शिवजयंती उत्सवातील मुख्य मिरवणुकीवर त्यांच्या गटाचा दावाच योग्य असल्याचे बोलले जाते. त्यामुळे यावर्षीच्या मिरवणुकीसाठी शिंदे शिवसेनेला परवानगी मिळाल्यास कोणतेही आश्‍चर्य निर्माण होणार नाही.

Visits: 60 Today: 2 Total: 113045

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *