भाजपाच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यावर संगमनेरात गुन्हा! मुस्लिम धर्मियांची शहर पोलिसांत तक्रार; शुक्रवारचा निषेध मोर्चा मात्र रद्द..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहमंद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन जगभरातील मुस्लिम अनुयायांच्या रोषास कारणीभूत ठरलेल्या भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यावर संगमनेरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी (ता.17) संगमनेरातील मुस्लिम समाज शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार होते. मात्र स्थानिक पोलिसांनी देशातील सद्यस्थितीचा विचार करता असा कोणताही प्रकार न करण्याची केलेली विनंती संगमनेरातील मुस्लिम समाजाने मान्य केली असून शुक्रवारचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात बोलतांना भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहंमद पैगंबर व त्यांच्या धर्मपत्नी हजरत आयशा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकारानंतर केवळ देशातच नव्हेतर आंतररराष्ट्रीय पातळीवरील मुस्लिम धर्मियांनी शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबावानंतर भाजपाने शर्मा यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केली, मात्र त्यांना अटक न झाल्याने देशभरातील संतप्त मुस्लिम धर्मियांनी गेल्या शुक्रवारी (ता.10) देशात अनेक ठिकाणी मोर्चे काढून नूपुर शर्मा यांचा निषेध करीत त्यांच्या अटकेची मागणी केली.

या दरम्यान देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्याही घटना घडल्याने वातावरण दुषीत झालेले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसही सतर्क असतांना येत्या शुक्रवारी (ता.17) दुपारच्या नमाजनंतर संगमनेरात निषेध मोर्चा काढण्याचा विषय समोर आला. त्यामुळे पोलिसांची धाकधूक वाढलेली असतांना पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व श्रेष्ठांशी सविस्तर चर्चा करुन त्यांना मोर्चा काढण्यापासून परावृत्त केले. मात्र मुस्लिम धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करुन नूपुर शर्मा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी दाखविली.

त्यानुसार शहरकाजी सय्यद अब्दुल रकीब अब्दुल वहाब पीरजादे यांनी शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी नूपुर शर्मा यांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 153 (अ), 295 (अ), 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या विरोधात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याने शर्मा यांच्या अडचणीतही मोठी वाढ झाली आहे. संगमनेरात गुन्हा दाखल झाल्याने नूपुर शर्मा यांना आता संगमनेर पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर व्हावे लागेल. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने संगमनेरातील मुस्लिम समाजाने समाधान व्यक्त केले असून शुक्रवारचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

