माहुली फाटा ते हिवरगाव पठार रस्त्याची दयनीय अवस्था
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील माहुली फाटा ते हिवरगाव पठार रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्ता मंजूर असूनही संबंधित ठेकेदाराने अर्धवट काम केल्याने नागरिकांना पायी चालतानाही कसरत करावी लागत आहे. शेतमालाची आणि प्रवासी वाहतूक करणेही वाहनचालकांना कठीण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील पठारभाग म्हणजे कायमच मुलभूत सुविधांची वाणवा असलेला भाग होय. प्रशासकीयदृष्ट्या संगमनेर तालुक्यात मोडणारा आणि विधानसभा मतदानासाठी अकोलेत येणार्या या भागाकडे लोकप्रतिनिधींसह अधिकार्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने अनेक वाड्या-वस्त्यांवर स्वातंत्र्यानंतरही पाणी, वीज, आरोग्य, रस्ते आदी मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. याचाच प्रत्यय माहुली फाटा ते हिवरगाव पठार रस्त्याच्या दयनीय अवस्थेवरुन अनुभवयास मिळतो. हा रस्ता साकूर परिसरातील नागरिकांना संगमनेरला येण्यासाठी अतिशय जवळचा आहे. त्यामुळे अनेकजण या रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करतात. तसेच माहुली परिसरातील नागरिकांचा दैनंदिन व्यवहारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा रस्ता आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता मंजूर असूनही संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट केल्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आधीच लोकप्रतिनिधी व अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने हा रस्ता कधी पूर्ण होईल, असा प्रश्नही नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.