ढिम्म व्यवस्थेनेच घेतला महाविद्यालयीन तरुणाचा बळी! मानवी जीव झाला स्वस्त; दुर्घटनेची शक्यता असूनही सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष..

श्याम तिवारी, संगमनेर
भंडारदरा धरणातून उन्हाळी आवर्तन सुरु झाल्याच्या 21 व्या दिवशी अघटीत घडलेच. गेल्या 10 मे रोजी धरणातून प्रवरापात्रात पाणी सोडण्यात आले होते. सिंचनासाठी भर उन्हाळ्यात सुटलेल्या या प्रदीर्घ आवर्तनादरम्यान सालाबादप्रमाणे संगमनेरच्या प्रवराकाठी अबालवृद्धांची गर्दी दाटणार आणि अनेकांना पाण्यात उतरण्याचा मोह होणार हे निश्चित होते. अशा प्रकारची दुर्घटना घडण्याची शक्यताही स्थानिक माध्यमांनी वर्तविली होती. मात्र हप्तेखोर यंत्रणांच्या आशीर्वादाने पुराणात अमृतवाहिनी ठरलेल्या प्रवरेची आजची अवस्था साक्षात मृत्यूवाहिनी सारखी झाली आणि तिने मंगळवारी एका उमद्या तरुणाला अखेर कवटाळलेच. गेल्या काही वर्षात नदीपात्राची झालेली प्रचंड दुर्दशा आणि अशाप्रकारच्या दुर्घटनेची पदोपदी शक्यता कायम असतानाही ढिम्म व्यवस्थेने त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच मंगळवारची अघटीत घटना घडली आणि त्यात पठारभागातील संकेत वाडेकर या एकुलत्या एक मुलाचा नाहक बळी गेला. दुर्घटनेनंतर केवळ मृतदेह शोधून काढण्यात आघाडीवर असलेल्या यंत्रणा अशा घटना घडणारच नाहीत यासाठी कधी काम करणार? की हप्त्यांच्या ओझ्याखाली मानवी जीवाची किंमत शून्य झाली आहे असा संतप्त सवालही यानिमित्ताने मनामनात निर्माण झाला आहे.

मागील काही वर्षात संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रातून अहोरात्र बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. याबाबत संगमनेरातील पर्यावरणप्रेमींनी अधिकार्यांपासून राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाच्या उंबर्यात जावून प्रवरा नदी वाचवण्याचे साकडे घातले, मात्र प्रत्येक उंबर्यातून त्यांनाच प्रतिप्रश्न ऐकून अबोल होवून परतावे लागले. त्याचा परिणाम संगमनेरात वाळू तस्करांच्या गुन्हेगारी टोळ्या तयार झाल्या आणि प्रवरा नदीपात्रात त्यांचा अनिर्बंध संचारही वाढला. दिसेल तेथून आणि वाट्टेल तितकी वाळू उपसण्याची त्यांच्यात स्पर्धा लागल्याने गेल्या अवघ्या दहा वर्षांतच कधीकाळी वाळूने ओतप्रोत भरलेल्या प्रवरेची पातळी तब्बल 25 ते 35 फुटांपर्यंत खाली गेली. त्याचा परिणाम अनेक ठिकाणी नदीपात्रातील खडक वर आले व त्यात कपारी निर्माण होवून एकप्रकारे मानवी मृत्यूचे जाळेच तयार झाले.

सरळ पात्रातील वाळू उपसून झाल्यानंतर फुकट मिळणार्या पैशांच्या लालसेने वाळू तस्करांच्या असंख्य टोळ्या शहरालगतच्या प्राचीन घाटांभोवती घोंगावू लागल्या. म्हणता म्हणता गेल्या चार-पाच वर्षांतच या टोळ्यांनी अगदी गंगामाईच्या साधारण घाटापासून ते थेट विजय घाटापर्यंतचा संपूर्ण परिसर अक्षरशः पोखरुन काढला. आपली कृती मानवी जीव घेणारी ठरेल याची पूर्ण कल्पना असतांनाही या वाळू तस्करांनी त्याकडे दुर्लक्ष करीत अगदी घाटांच्या खालूनही मिळेत तशी वाळू उपसण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कृत्याला हप्त्यांच्या ओझ्यात दबलेल्या स्थानिक महसूल व पोलीस यंत्रणांसह अगदी अहमदनगरची स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूरच्या अप्पर अधीक्षक कार्यालयातील हप्तेखोर कर्मचार्यांचीही मूक संमती लाभली. त्यामुळे संगमनेरचे नदीपात्र या हप्तेखोर व्यवस्थेने एकप्रकारे वाळू तस्करांच्या हवालीच केल्याने कोणालाही न घाबरता या टोळ्यांनी काही वर्षातच प्रवरेची दयनीय अवस्था केली.

काही वर्षांपूर्वीपर्यंत संगमनेरच्या प्रवरानदीवरील गंगामाईचा घाट म्हणजे अबालवृद्धापर्यंतच्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी अगदी सुरक्षित समजला जायचा. विजय घाटानजीकच्या वडाखालील नदीपात्रात तर दोन-पाच वर्षांची लहान मुले आणि महिलाही अगदी निर्भयीपणाने नदीत उतरुन अंघोळीचा आनंद घेत असतं. मात्र गेल्या चार-पाच वर्षातच परिस्थिती पूर्णतः बदलली असून आजच्या स्थितीत संगमनेरचे नदीपात्र केवळ पोहता येणार्यांसाठीच राहिले आहे. ज्या व्यक्तीला पोहता येत नाही, अशी व्यक्ती कोणत्याही घाटावरुन नदीत उतरली की ती कधी अचानक गायब होईल हे सांगता येणार नाही इतकी भयानक अवस्था आज प्रवरेची झाली आहे. मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक ना शासकीय यंत्रणेला आहे, ना राजकीय धुरिणांना. त्यामुळे संगमनेरात मानवी जीवाची किंमत शून्यच असल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.

मंगळवारी (ता.31) आवर्तन सुटल्याच्या 21 व्या दिवशी दुपारी साडेचारच्या सुमारास चौघे मित्र गंगामाई घाटावर आंघोळीसाठी उतरले. जवळपास तासभर त्यांनी पात्रात आंघोळीही केल्या. या दरम्यान त्यातील संकेत भाऊसाहेब वाडेकर या विद्यार्थ्याला त्याच्या बहिणीचा फोनही आला. पात्रातून बाहेर येवून तो आपल्या बहिणीशी बोलला देखील, मात्र हा फोन आपल्या कुटुंबाशी जीवनातील शेवटचा ठरेल याची पुसटशीही कल्पना ना त्याला आली, ना त्याच्या बहिणीला. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच कधीकाळी सुरक्षित असलेल्या, मात्र प्रचंड वाळू उपशामुळे आज पदोपदी घातकी ठरलेल्या गंगामाई घाटासमोरील वाळूच्या प्रचंड मोठ्या खड्ड्याने त्याला गिळले आणि स्थानिक यंत्रणांना दुर्घटनेची शक्यता ज्ञात असतानाही अनेकांच्या डोळ्यांदेखत एका उमद्या तरुणाचा हकनाक बळी गेला.

संगमनेरच्या पठारभागातील साकूरचा रहिवासी असलेला संकेत भाऊसाहेब वाडेकर हा एकोणावीस वर्षाचा विद्यार्थी चार बहिणींच्या पाठीवर नवसाने जन्माला आला होता. दुष्काळी भागातील शेतीत राबणार्या आपल्या आई-वडीलांची सर्व स्वप्नं पूर्ण करावीत, शिकून मोठं व्हावं, खेळात नैपुण्य मिळवून जगात नाव कमवावं असं खूप मोठं स्वप्नं सोबत घेवून त्याने संगमनेर महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. शिक्षणासोबतच त्याला क्रिकेटचेही भलतेच वेडं असल्याने त्याने या खेळातही विशेष नैपुण्य प्राप्त केले होते. महाविद्यालयात क्रिकेट खेळताना आपल्या संघाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज म्हणून त्याने लौकिक मिळविला होता. सर्वांशी प्रेमाने बोलणे, सुसंस्कृत वागणे हा त्याचा स्वभाव अनेकांना भूरळ घालणारा होता. सामान्य शेतकरी कुटुंबातून असल्याने त्याला आपल्या परिस्थितीचीही पूर्ण जाणीव होती.

त्यामुळे त्याच्या राहणीमानातही भडकपणा कोठेही दिसत नव्हता. मात्र त्याचा हा चांगुलपणा मृत्यूला भावला नाही आणि त्याचा वाळू तस्करांच्या भल्यामोठ्या खड्ड्यात बुडून अखेर जीव गेला. ही घटना संगमनेरातील प्रत्येकाला वेदना देणारी ठरली, त्यातून आपल्या मुलांच्या काळजीने अनेकांना ग्रासले. ज्या तीन मित्रांच्या डोळ्यादेखत तो बुडाला त्यांची अवस्था तर अद्यापही अवघड आहे. तो जेव्हा त्यांच्या डोळ्यादेखत बुडत होता तेव्हा या तिघांनीही जीवाच्या आकांताने एकच ओरडाही केला, त्यावेळी आसपास अनेकजण पोहतही होते. मात्र त्या प्रत्येकाला नदीपात्राची चांगली ओळख असल्याने त्यातील कोणीही त्यांच्या मदतीला धजावले नाही. त्याचा परिणाम अवघ्या एकोणावीस वर्षांचा संकेत अनेकांच्या डोळ्यादेखत काही क्षणातच अदृष्य झाला. त्याचा अकाली बळी संगमनेरच्या ढिम्म आणि हप्तेखोर व्यवस्थेनेच घेतल्याची चर्चा मात्र त्यानंतर सुरु झाली.

संगमनेरच्या वाळू तस्करांमध्ये ना माणुसकी जिवंत आहे ना त्यांना कशाचेही सोयरसुतक. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास साकूरचा संकेत वाडेकर हा विद्यार्थी गंगामाई घाटावर बुडून मरण पावला. त्यानंतर तासाभराने साडेसहाच्या सुमारास त्याच ठिकाणाहून त्याचा मृतदेह बाहेर काढला गेला. या दुर्दैवी घटनेने शहरासह संपूर्ण पठारभाग हळहळलेला असताना रात्री आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली त्याच ठिकाणी वाळू तस्करांच्या दोन ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा सुरु होता. यावरुन संगमनेरातील वाळू तस्करांनी आता भस्मासूराचे रुप धारण केल्याचेच दिसून आले. हा प्रकार पाहणार्या अनेकांना हे सहन करण्यापलिकडचे होते, मात्र ते सगळेच हतबल होते.

