साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर सहा नवीन सदस्यांची नियुक्ती विश्वस्त मंडळ परिपूर्ण झाल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राज्य सरकारने 6 सदस्यांची नियुक्ती केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. रिकाम्या जागांवर नियुक्त करण्यात आलेल्या या सदस्यांमध्ये मीना शेखर कांबळी, सुनील सदाशिव शेळके, सुभाष दिगंबर लाखे, डॉ. जालिंदर बाळाजी भोर, दत्तात्रय पांडुरंग सावंत आणि सचिन पराजी कोते यांचा समावेश आहे. राज्य सरकारने एका अधिसूचनेद्वारे या नियुक्त्या केल्या आहेत.

श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर झालेल्या सदस्यांच्या नियुक्तीच्या अधिसूचनेनुसार मीना शेखर कांबळी यांची महिला वर्गातून, सुनील सदाशिव शेळके यांची सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या वर्गातून, सुभाष दिगंभर लाखे यांची सार्वजनिक प्रशासन वर्गातून, डॉ. जालिंदर बाळाजी भोर यांची सार्वजनिक आरोग्य वर्गातून, दत्तात्रय पांडुरंग सावंत यांची ग्रामविकास वर्गातून आणि सचिन पराजी कोते यांची सर्वसाधारण वर्गातून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिर्डी नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे पदसिद्ध असणार आहेत.

यापूर्वी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर 11 विश्वस्तांची नियुक्ती झालेली आहे. आजच्या सहा सदस्यांच्या नियुक्तीनंतर ही संख्या 18 इतकी झाली आहे. आज नियुक्ती करण्यात आलेल्या सदस्या मीना कांबळी, सचिन कोते आणि डॉ. जालिंदर भोर हे शिवसेनेचे आहेत. तर, सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सुभाष लाखे आणि दत्तात्रय सावंत हे काँग्रेस पक्षाचे आहेत. या आधीच्या विश्वस्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. अपुर्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आल्याने अपुर्या मंडळाला कामकाज पाहता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले होते. याला मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती देत दैनंदिन कामकाज पाहण्याची मुभा मंडळाला दिली होती. मात्र मोठे धोरणात्मक आणि आर्थिक निर्णय घेऊ नयेत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. आता मात्र 6 नव्या सदस्यांच्या नियुक्तीनंतर विश्वस्त मंडळ परिपूर्ण झाल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
