साईनगरीत नगरपंचायतीकडून कोरोनाबाबत जनजागृती मोहीम नियम पाळून नगरपंचायतीला सहकार्य करण्याचे केले आवाहन

नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व पदाधिकार्‍यांनी बुधवारी (ता.24) साईनगरीत जनजागृती मोहीम काढून भाविकांसह नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना कोरोना विषाणूने पुन्हा विळखा घातला आहे. त्याठिकाणी टाळेबंदी, संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय खात्यीचे देवस्थान असल्याने याठिकाणी विविध राज्यांतून, जिल्ह्यांतून भाविक व रोजगारासाठी नागरिक येत असतात. त्यामुळे बाहेरून येणारांची अधिक वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, नगरसेवक अभय शेळके, गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर, अनिल शेजवळ, रवींद्र गोंदकर, मुरलीधर देसले, रावसाहेब म्हस्के, विलास लासुरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष गोंदकर म्हणाले, बैठकीत सांगितलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंबलबजावणी केली जाणार आहे. मास्कचा वापर नागरिकांनी करणे अनिवार्य राहणार आहे. रस्त्यावर थुंकणार्‍यांना कारवाई सामोरे जावे लागेल. दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करून नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यापूर्वी प्रमाणेच नागरिकांची ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनिंग तपासणी केली जाणार आहे. अँटिजेन चाचणीत वाढ केली जाणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असणार आहे. मंगल कार्यालयात पन्नासपेक्षा अधिक लोकांना परवानगी दिली जाणार नाही. गर्दी करता येणार नाही आदी नियमांचे पालन करावेच लागणार असल्याचे गोंदकर यांनी ठासून सांगितले.

Visits: 118 Today: 1 Total: 1414135

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *