पोक्सोतंर्गत गुन्ह्यातील आरोपीस दहा वर्षांचा कारावास! सात वर्षांपूर्वीचे प्रकरण; संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्या घरातून पळवून नेले, तिच्या गळ्यात खोटे मंगळसूत्र घालून लग्नाचा बनाव केला व नंतर वणी, नाशिक व दमण अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी संतोष अशोक वाडेकर याला 10 वर्षांच्या कारावासासह चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर सदर खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद आणि सादर केलेले साक्षीपुरावे मान्य करीत अपहरण, अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलमान्वये आरोपीला दोषी ठरवताना त्याला शिक्षा सुनावली.

याबाबतची हकीगत अशी की, या प्रकरणातील पीडित मुलीच्या आईने 19 मे, 2015 रोजी याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार रहाणेमळा परिसरातील लक्ष्मीनगर येथे रहात असलेल्या संतोष अशोक वाडेकर याने त्यांच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याचदिवशी पहाटे तीन वाजता फूस लावून घरातून पळवून नेले. त्यावरुन पोलिसांनी सुरुवातीला भा.दं.वि. कलम 363, 366 (अ) नुसार गुन्हा दाखल करुन तपसा पोना.केरुळकर यांच्याकडे सोपविला. मात्र या दरम्यान अपहृत मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याकडील तपास काढून तो सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पाळदे यांच्याकडे सोपविण्यात आला.

सपोनि.पाळदे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करताना आरोपीसह अपहृत मुलीचा शोध लावला व थेट दमण येथे छापा घालीत दोघांनाही ताब्यात घेवून तपासकामी संगमनेरात आणले. यावेळी पोलिसांनी पीडित मुलीचा जवाब नोंदविला असता तिने सदर तरुणाने आपणास बळजोरीने पळवून नेवून वणी (जि.नाशिक) येथे खोटे मंगळसूत्र गळ्यात घालून लग्नाचा बनाव केला. त्यानंतर त्याने पीडितेसह तेथून नाशिक व नाशिकहून दमण येथे घेवून गेला. तेथे ते दोघेही तीन ते चार दिवस राहिले. या दरम्यान आरोपीने पीडितेशी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा जवाब नोंदविल्याने पोलिसांनी दाखल गुन्ह्याची व्याप्ती वाढवताना भा.दं.वि. कलम 376 (2)(क)(एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 5 (एल), 6 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रॉसिटी) कलम 3 (1) (12), 3 नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पाळदे यांनी केला. गुन्ह्याचे अंतिम दोषारोप पत्र अप्पर अधीक्षक राकेश ओला यांनी न्यायालयात दाखल केले. हा खटला संगमनेरचे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर चालला. या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासले, त्यासोबतच सरकारी अभियोक्ता बी. जी. कोल्हे यांनी जोरदार युक्तीवाद करीत सादर केलेले पुरावे व त्याआधारे आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी मान्य करीत न्यायालयाने आरोपी संतोष अशोक वाडेकर याला भारतीय दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण) नुसार पाच वर्षांचा कारावास, चार हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिने साधी कैद,

अत्याचाराचे कलम 376 (2) (आय) नुसार 10 वर्षांचा कारावास व चार हजारांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, 376 (2) (एन) नुसार 10 वर्ष कारावास, चार हजारांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 6 नुसार 10 वर्षांचा तुरुंगवास, चार हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सदर खटल्याचे कामकाज संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात चालले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अभियोक्ता बी. जी. कोल्हे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार एस. डी. सरोदे, कैलास कुर्हाडे, पोहेकॉ. चंद्रकांत तोर्वेकर, प्रवीण डावरे, पोकॉ. स्वाती नाईकवाडी व दीपाली दवंगे यांनी कामकाज पाहिले.

