जादूटोणा भोवला; फरार फादर गौडाला बेड्या!

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
काविळी सारख्या गंभीर आजारावर तंत्रमंत्राने उपचार करत महिलेला औषधोपचारांपासून दूर ठेवणाऱ्या आणि परिणामी तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चर्चच्या फादरला पोलिसांनी अखेर १५ दिवसांनी बेड्या ठोकल्या. अंधश्रद्धेच्या विरोधात राज्यात जनतेने आवाज उठवल्यानंतर आणि विविध शहरांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे मोर्चे निघाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. फादर चंद्रशेखर गौडा (रा. बागुल वस्ती कोपरगाव) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात संजय जीवन पंढरे (रा. खेड शिवापुर जिल्हा पुणे, हल्ली रा. काळे वस्ती, मारुती मंदिराजवळ, खडकी कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की मी वरील ठिकाणचा रहिवासी असून
सध्या नोकरीनिमीत्त पुणे येथे राहत असतो. खडकी येथे माझा भाऊ गंगा जिवन पंढरे, सागर जिवन पंढरे असे त्यांचे मुलाबाळासह राहतात. बहीण वनिता विश्वनाथ हारकळही खडकी येथे आमचे घराचे जवळच राहत होती. तिचे दोन लग्न झालेले असुन तिचे दोन्ही पती वारलेले आहेत. तिला पहील्या पतीपासुन मुलगा मयुर संजय चौधरी व दुसऱ्या पती पासुन मुलगी शिवानी विश्वनाथ हारकळ ही मुले झालेले आहेत. त्यांचा मुलगा मयुर हा गॅस पाईपलाईनचे काम करतो.

दिनांक १ जुलै २०२५ रोजी माझी बहीण वनिता विश्वनाथ हारकळ ही आजारी होती म्हणुन तिला माझा पुतणा विवेक पंढरे याने डॉ. फुलसौंदर यांचे हॉस्पीटलमध्ये घेवुन गेला होता. डॉक्टरांनी गोळ्या औषध देवून रक्त, लघवी चेक करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी धाडीवाल डॉक्टरचे लॅबमध्ये रक्त लघवी चेक करुन ते रिपोर्ट डॉक्टरांना दाखवुन ते घरी आले होते. डॉ. फुलसौंदर यांनी दिलेल्या गोळ्या औषध घेवुन देखील वनिता हिस बरे वाटत नसल्याने पुतण्या विवेक हा बहिनीला परत दि.३ जुलै रोजी डॉ. फुलसौंदर यांचेकडे गेला, तेव्हा डॉक्टरांनी बहिण वनिता हिस तपासून तिचे छातीचे एक्सरे काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याच दिवशी गणपती सिटीस्कॅन कोपरगाव येथे छातीचे एक्सरे काढुन डॉक्टरांना दाखवले तेव्हा डॉक्टरांनी एक्सरे पाहु वनिता हिस कावीळ झाली आहे.

तिची छाती जाम झाली असुन तिला दुसऱ्या हॉस्पीटलला घेवुन जाणे बाबद सांगितले होते. त्यानंतर बहीण वनीता हिस घरी घेवुन आल्यानंतर पुतण्या विवेक हा कावीळचे आयुर्वेदीक औषध व माळ आणण्यासाठी टिळेकर वस्तीवर जावुन त्याने तेथुन काविळ आजाराची माळ व आयुर्वेदीक औषध घेवुन आला. त्यावेळी घरी बहीण वनिता होती, भाची शिवानी हारकळ होती. त्यांचेजवळ चंद्रशेखर गौडा हे बसलेले होते. ते समतानगर मधील चर्च मध्ये फादर आहेत. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पुतण्या विवेक यांनी काविळ आजाराची आणलेली माळ व आयुर्वेदीक औषध बहीण हिस देत होता, तेव्हा फादर चंद्रशेखर गौडा म्हणाले की, वनिता हारकळ हिस कावीळ वगैरे काही झालेले नाही. तिला दवाखाण्याचा काही आजार नाही.

तिला बाहेरचे काही तरी झालेले आहे. ती औषधाने बरी होणार नाही. तिला मंत्र मारुन तेल देतो. ते तीन चार दिवस पिल्यानंतर बरे होवुन जाईल तुम्हांला कुठे दवाखाण्यात जाण्याची गरज नाही असे सांगुन फादर यांनी त्यांचेकडे असलेली पॅरॅशूट तेलाची बाटली बाहेर काढुन त्यावर हात ठेवुन काही तरी जादू टोना करुन, मंत्र मारुन, पाणी हाताने बाटलीवर शिंपडुन ते बाटलीतील तेल कपाळाला लावण्यास सांगुन त्रास होईल तेव्हा बाटलीतील तेल पिण्यास सांगितले. त्याप्रमाणे बहीण वनिता हिने त्या बाटलीतील जादू टोना केलेले तेल कपाळाला लावले व पिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.४ जुलै रोजी वनिता हिची प्रकृती आणखीन बिघडली, तेव्हा पुतण्या विवेक व भाची शिवानी यांना मी बहीण वनीता हिचे प्रकृती जास्त कशी काय बिघडली बाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, चंद्रशेखर गौडा फादर यांनी तेलावर मंत्र मारुन ते पिण्यास सांगितले होते ते पिल्यामुळे जास्तच प्रकृती बिघडली असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला प्रवरा हॉस्पीटल लोणी येथे घेवुन गेलो तेथे तिला डॉक्टरांनी ऐंडमीट केले होते.

तिथे उपचार चालु असतांना दि. ९ जुलै रोजी ती मयत झाली.दि.३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास माझी बहीण वनिता हारकळ (वय ४२ वर्षे रा. खडकी ता. कोपरगाव) हिस कावीळ हा आजार झालेला असतांना देखील फादर चंद्रशेखर गौडा यांनी बहीण हारकळ हिस बाहेरचे झाले असल्याचे सांगून तिला औषध उपचार न घेण्याचे सांगुन तिला त्यांचेकडे असलेली पॅरॅशूट तेलाची बाटलीवर, हात ठेवुन काही तरी मंत्र मारुन, पाणी हाताने शिंपडुन जादुटोना करुन बाटलीतील जादूटोना केलेले तेल कपाळाला लावून पिल्यामुळे ती मयत झाली असल्याची फिर्याद दिली होती.या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. घटनेनंतर १५ दिवस आरोपी फादर चंद्रशेखर गौडा फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक नेमण्यात आले होते.

अखेर त्याला कोपरगाव परिसरातून अटक करण्यात आली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव आणि आसपासच्या भागात एका मोठ्या धर्मांतर रॅकेटचे संचालन सुरू असल्याचे संकेत मिळाले असून, त्यात गरीब, आजारी आणि अशिक्षित व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याची चर्चा आहे. ‘तांत्रिक उपचार’, ‘मुक्ती प्रार्थना,’ ‘भूतबाधा दूर करणे’, ‘चमत्कारी तेल’ यासारख्या मार्गाने आधी मानसिक पकड निर्माण केली जाते, त्यानंतर धार्मिक बदल घडवून आणला जातो, असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.ही घटना अंधश्रद्धेचे किती भीषण स्वरूप असू शकते, याचे जिवंत उदाहरण आहे. अशा प्रकारांच्या विरोधात जागरूकता आणि कायद्याची अंमलबजावणी ही काळाची गरज बनली आहे.

फादर चंद्रशेखर गौडा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०६(१) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समय उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याशी संबंधित चर्चची तपासणी, आर्थिक व्यवहारांची चौकशी, तसेच धर्मांतराचे आरोप तपासले जात आहेत. मृत महिलेच्या कुटुंबीयांनीही न्यायाची मागणी करत पोलिसांकडे कठोर कारवाईचा आग्रह धरला आहे.

Visits: 141 Today: 2 Total: 1114189
