संगमनेरातील गंगामाई घाट परिसरातून वाळूतस्करी जोमात सुरू संतप्त पर्यावरणप्रेमी नागरिकांनी शेकडो गोण्यांतील वाळू ओतली नदीत


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर दहा महिन्यांपूर्वी महसूल मंत्रीपदी विराजमान झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन गौणखनिज धोरणाचा उहापोह करीत राज्यातील गौणखनिज उत्खननावर कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे राज्यातील विरोधकांकडून मंत्री विखेंकडून विकासकामांमध्ये अडथळे येत असल्याचे आरोपही केले. काही दिवसांपूर्वी राज्याने नवीन गौणखनिज धोरणही कागदावर उतरविले. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. एकीकडे शासकीय स्तरावर गौणखनिजावरुन सुरू झालेला हा गोंधळ मिटता मिटत नसताना दुसरीकडे विविध नद्यांमधून सुरू असलेली बेकायदा वाळूतस्करी मात्र जोमात आली आहे. त्याचे वास्तव दर्शन आज सकाळी संगमनेर शहरातील गंगामाई घाट पसिरात घडले.

या परिसरात सकाळी फिरण्यासाठी येणार्‍यांना रोज अमृतवाहिनीचे तुटणारे लचके पाहून आज भरुन आले आणि त्यांनी येथील वाळूतस्करी थांबण्यासाठी अचानक आंदोलन पुकारले. यावेळी वाळूतस्करांनी घाटांवर गोळा करुन ठेवलेल्या शेकडो गोण्या वाळू पुन्हा नदीपात्रात ओतून दिली. यानंतर गंगामाई परिसरात सुमारे 50 लोकांनी तासभर बैठा सत्याग्रह करीत संगमनेरच्या प्राचीन घाटांचे जीव वाचवावेत अशा आर्त आरोळ्याही ठोकल्या. मात्र बेकायदा वाळू उत्खननातून मिळणार्‍या अमाप पैशांमुळे आधीच बधीर झालेल्या यंत्रणेच्या कानापर्यंत त्या पोहोचल्यात की नाही याबाबत मात्र साशंकता कायम आहे.

शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आज आणि यापूर्वी वेळोवेळी किमान घाटांच्या परिसरातून होणारी वाळूतस्करी रोखावी यासाठी संगमनेरच्या लोकप्रतिनिधींसह स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी विनवण्या केल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून तात्पुरती मलमपट्टी वगळता आजवर कधीही धडक कारवाया झाल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे संगमनेर परिसरातील घाटांच्या क्षेत्रांतून होणार्‍या वाळूतस्करीला प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचार्‍यांचे भक्कम पाठबळ असल्याचे लपून राहिले नाही. त्यामुळे आज सकाळी गंगामाई परिसरात फिरण्यासाठी येणार्‍या पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनातून नेमकं काय साधलं जाईल याबाबत मात्र अनिश्चितता कायम आहे.

संगमनेरच्या प्रवरा परिसराला मोठे प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील अनेक घाट शंभर-दीडशे वर्षांहून अधिक प्राचीन असून दर बारा वर्षांनी नाशिकच्या कुंभमेळ्यात दाखल होणारे दक्षिणेतील नागपंथीय साधू परतीच्या प्रवासात अमृतवाहिनीच्या पाण्याने स्नान केल्याशिवाय मार्गस्थ होत नाहीत. मात्र संगमनेरचा इतिहास आणि परंपरेबाबत स्थानिक पुढार्‍यांना काहीएक घेणेदेणे नसल्याने गेल्या काही वर्षात कधीकाळी अमृत वाहून नेणार्‍या प्रवरा नदीची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. येथील वाळूचोर इतके मुजोर बनले आहेत की त्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. त्यालाच विरोध करण्यासाठी गंगामाई परिसरात येणार्‍यांनी आज आंदोलन केले. अर्थात यापूर्वीही अशी अनेक आंदोलने झाली आहेत, मात्र त्यातून आजवर काहीही निष्पन्न झालेले नाही.

Visits: 225 Today: 1 Total: 1953662

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *