संगमनेर उपविभागातील अवघ्या अठ्ठावीस धार्मिक स्थळांचे भोंग्यासाठी अर्ज! एकट्या संगमनेरातून सर्वाधिक 25 अर्ज; मात्र अद्याप कोणालाही परवानगी दिलेली नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे धार्मिक स्थळांवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा तापत असताना दुसरीकडे लाऊडस्पीकरच्या परवानगीसाठी मात्र निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. संगमनेर उपविभागातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दित सर्वधर्मीयांची एकूण 554 प्रार्थनास्थळे असून त्यातील 140 धार्मिक स्थळांवर भोंग आहेत, प्रत्यक्षात मात्र त्यातील केवळ 28 धार्मिक स्थळांनी त्यासाठी परवानगीचे अर्ज दाखल केले आहेत. तर, संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 118 प्रार्थनास्थळे असून त्यातील केवळ 41 ठिकाणी लाऊडस्पीकर वाजविला जातो. मात्र आत्तापर्यंत एका मंदिरासह केवळ 24 प्रार्थनास्थळांनी त्यासाठी अधिकृत परवानगी मागितली आहे. अर्थात ध्वनीप्रदूषण कायद्यानुसार वर्षभर परवानगी देण्याची तरतूद नसल्याने व त्याबाबतचा नेमका मसूदाही तयार नसल्याने पोलिसांकडून अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही.
गेल्या महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. मराठी नववर्षाच्या दिनी मुंबईत झालेल्या त्यांच्या जाहीर सभेत या विषयावर जोरदार टीका करताना त्यांनी पहाटेपासूनच सुरु होणार्या धार्मिक भोंग्यांमुळे वृद्ध, आजारी व्यक्ती व विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचा व ध्वनीपातळीचा हवाला दिला होता. राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग अनधिकृत असून ते खाली उतरवावे असा इशारा देतांना त्यासाठी त्यांनी 3 मे पर्यंतचा ‘अल्टीमेटम’ही राज्य सरकारला दिला होता. त्यांच्या सभेनंतर केवळ महाराष्ट्रच नव्हेतर संपूर्ण देशातील वातावरण तापले आणि धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा विषय चांगलाच गरम झाला.
त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रार्थनास्थळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 2005 साली दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन करण्यास सुरुवात झाली. या दरम्यान आपापल्या प्रार्थनास्थळावरील भोंगे अधिकृत करण्याचाही विषय समोर आल्याने राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात त्याबाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली. अनेक धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी याबाबत आपल्या हद्दितील पोलीस ठाण्यांमध्ये परवानगीचे अर्जही दाखल करण्यास सुरुवात केली. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या ध्वनी प्रदूषण कायद्यात वर्षभर लाऊडस्पीकर वाजविण्यासाठी परवानगी देण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे दाखल झालेल्या अर्जांचा निवाडा कसा करावा या संभ्रमात राज्यातील पोलीस विभाग सापडला आहे.
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात एकूण 4 हजार 132 धार्मिक स्थळे आहेत. त्यात 2 हजार 736 मंदिरे, 784 मशिदी, 294 मदरसे, 58 दर्गे, 63 बुद्धविहार, 13 गुरुद्वारे व 184 चर्च आहेत. यातील 2 हजार 423 धार्मिक स्थळांवर भोंगे लावलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात त्यातील केवळ 127 धार्मिक स्थळांनी नियमीत परवानगीसाठी अर्ज केलेले असून जिल्ह्यातील अवघ्या सहा धार्मिक स्थळांना आत्तापर्यंत अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. संगमनेर उपविभागात संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव व आश्वीसह अकोले व राजूर अशा एकूण सहा पोलीस ठाण्यांसह दहा लाखांहून अधिक लोकसंख्येचा समावेश आहे.
संपूर्ण संगमनेर उपविभागात एकूण 554 धार्मिक स्थळे असून त्यात 358 मंदिरे, 95 मशिदी, 53 दर्गे, 14 मदरसे, 17 बुद्धविहार, दोन गुरुद्वारे व पंधरा चर्च आहेत. त्यातील 140 धार्मिक स्थळांवर भोंगे असून आत्तापर्यंत केवळ 28 धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी लाऊडस्पीकरसाठी परवानगी मागणारे अर्ज दाखल केले आहेत, मात्र अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 118 धार्मिक स्थळे आहेत. त्यात 41 मंदिरे, 36 मशिदी, 23 दर्गे, आठ मदरसे, चार बुद्धविहार, दोन गुरुद्वारे व चार चर्चचा समावेश आहे. यातील 32 मशिदी व नऊ मंदिरांवर मिळून एकूण 41 ठिकाणी लाऊडस्पीकर बसविलेले आहेत. आत्तापर्यंत केवळ 24 मशिदींच्या विश्वस्तांसह नेहरु चौकातील तट्ट्या मारुती मंदिराच्या व्यवस्थापनाने लाऊडस्पीकरच्या परवानगीसाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. तर दोन मशिदींच्या अर्जासोबत मागणी करुनही आवश्यक असलेली कागदपत्रे जोडण्यात आलेली नसल्याने पोलिसांच्या मते त्या दोन्ही मशिदी अनधिकृत आहेत. उर्वरीत सहा मशिदींसह आठ मंदिरांनी अद्यापही परवानगीसाठी अर्ज दिलेले नाहीत.