पिंपळगाव खांड धरणातून चार गावांना होणार पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता नागरिकांनी व्यक्त केला आनंद

नायक वृत्तसेवा, अकोले
गेली अनेक वर्षे दुष्काळ व पाणी टंचाईशी दोन हात करणार्‍या ब्राह्मणवाडा (ता.अकोले) परिसराला मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणातून पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामस्थ करत होते. ग्रामस्थांची मागणी आणि ग्रामपंचायतीचा पाठपुरावा यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ब्राह्मणवाडा, खुंटेवाडी, कळंब व मन्याळे या चार गावांना 22 कोटी 76 लाख 52 लाख रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेस शासनाकडून 2 मे, 2022 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

अकोले तालुक्याच्या दक्षिण टोकावर आणि भौगोलिकदृष्ट्या उंचावर, डोंगराळ असलेला हा परिसर जवळपास चौदा वाड्या व शेजारील दोन-तीन गावांचा विस्तीर्ण परिसर असून पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याने अगदी शिवकाळापासून सतत ग्रासलेला आहे. राजकीयदृष्ट्या सजग असला तरी शाश्वत पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून अजूनही वंचित आहे. सध्या गावाला शेजारील बेलापूर गावाच्या हद्दीत घेतलेल्या कूपनलिकांमधून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र कूपनलिकांचे पाणी बेभरवशाचे असूनही तेच पाणी पिण्याशिवाय लोकांसमोर पर्याय नाही. दरवर्षी उन्हाळ्यात 94.58 दशलक्ष घनफूट क्षमतेचा बेलापूर पाझर तलाव कोरडाठाक पडतो. परिणामी अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झालेले असतात. यापूर्वी ऐतिहासिक अहिल्याबाई बारव, आनंददरा पाझर तलाव, बेलापूर पाझर तलावातून दोन अशा एकूण चार नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईने होणारी होरपळ काही थांबत नव्हती.

मुरम्याचे धरण तसेच चिलेवाडी धरणातून या परिसराला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मध्यंतरी प्रयत्न झाले असले तरी तांत्रिकदृष्ट्या या योजना अडचणीच्या असल्यामुळे त्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता तालुक्यातील सहाशे दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणातून गावासाठी ही पाचवी नळपाणी पुरवठा योजना होणार असल्याने योजना चारही गावांना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याअभावी होणारे हालही थांबणार आहेत. या योजनेच्या काही अटी व शर्ती असून त्याबाबत नागरिकांना माहिती मिळावी. तसेच योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी येत्या बुधवारी (11 मे) ग्रामसभा ठेवण्यात आली आहे. पुढच्या उन्हाळ्यापर्यंत योजना पूर्ण व्हावी असा ग्रामपंचायतचा मानस आहे.

याकामी आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, जलसंपदाचे सेवानिवृत्त सदस्य सचिव रो. मा. लांडगे, मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक, उपअभियंता अकोले, अकोले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोले यांनी या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी विशेष प्रयत्न केले. तसेच याकामी चारही गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116129

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *