राहुरीच्या नगराध्यक्षपदी अनिता पोपळघट?

राहुरीच्या नगराध्यक्षपदी अनिता पोपळघट?
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या गुरुवारी (ता.24) शेवटच्या दिवशी अनिल कासार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अनिता दशरथ पोपळघट यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिला असून, शुक्रवारी (ता.25) नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बैठक होणार आहे. त्यात पोपळघट यांच्या बिनविरोध निवडीची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.


राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांची विधानसभेवर निवड होऊन, राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे पूर्ण बहुमत आहे. इतर मागास प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे. अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. कासार यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे जनसेवा मंडळाचे पक्षश्रेष्ठी माजी खासदार प्रसाद तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व पालिकेतील गटनेत्या डॉ.उषा तनपुरे यांच्या चर्चेनंतर दिलेल्या आदेशानुसार कासार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शुक्रवारी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी डॉ.श्रीनिवास कुरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक होणार आहे. त्यात, पोपळघट यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होईल.

Visits: 51 Today: 1 Total: 435763

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *